१६ हजार लीटर दुधाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:43 PM2017-10-04T23:43:30+5:302017-10-04T23:43:46+5:30
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाची वाढती मागणी लक्षात घेता शासकीय दुग्ध विकास यंत्रणेद्वारा शहरासाठी तीन दिवसांत आठ हजार लीटर दुधाचे नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाची वाढती मागणी लक्षात घेता शासकीय दुग्ध विकास यंत्रणेद्वारा शहरासाठी तीन दिवसांत आठ हजार लीटर दुधाचे नियोजन केले आहे. खासगी दूध डेअरींमध्येसुद्धा दुग्ध उत्पादकांकडून अंदाजे आठ हजार लीटर दुधाची विक्री होणार असल्याची माहिती आहे.
कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे विशेष महत्त्व असून ठिकठिकाणी नागरिक एकत्र येतात. चंद्रप्रकाशाच्या साक्षीने आनंदाने दूध उकळून पितात. या सणाकरिता शासकीय दुग्ध विकास यंत्रणेने तीन दिवसांत सहा हजार लीटर दुधाचे अतिरिक्त संकलन केले आहे. दोन हजार लीटर दुधाची मागणी वर्धा जिल्ह्याकडे नोंदविण्यात आली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील कारला येथे एका खासगी डेअरीमध्ये रोज १३ ते १४ हजार लीटर दुधाचे संकलन होते. परंतु ते दूध नागपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे.
दुग्ध विकास केंद्राकडून नोंदणीकृत प्राथमिक सहकारी दुग्ध उत्पादक संस्थाना खासगी डेअरींपेक्षा फारच कमी दर मिळत असल्याने अनेक संस्था बंद झाल्या, तर काही संस्था अवसायनात निघाल्या आहेत. परंतु ज्या काही ग्रामीण भागात दुग्ध उत्पादित शेतकरी आहेत. त्यांना खासगी डेअरींमध्ये ३५ ते ४० रूपये पर्यंत प्रतीलीटर भाव मिळत असल्याने तेथे दुधाच्या विक्रीला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी खासगी दुध डेअरींमध्ये धाव घेतली असून एक दिवस पूर्वीच दूध आरक्षित केले आहेत.
दुधाचे भाव वधारले
कोजागिरीसाठी गुरूवारी हजारो लीटर दुधाची आवक वाढणार आहे. बुधवारपासूनच खासगी दूध डेअरींवर नागरिकांनी धाव घेतली असून ४० ते ५० रूपये प्रतिलीटरला मिळणारे दूध ६० ते ७० रूपये लीटरपर्यंत विक्री केली जात आहे. शासकीय दुग्ध विकास केंद्रात तयार होणारे पाकीटबंद दूध किरकोळ विक्रेत्यांनी आरक्षित केलेले आहे.
एफडीएची नजर
दुधात पाणी टाकून भेसळ केली जाते. तसेच कृत्रिमरीत्या तयार केलेले दूध बाजारपेठेत विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुधातील 'सॉलिड नॉट फॅट' (एसएनएफ)चे प्रमाण तपासण्यात येणार असल्याचे अन्न प्रशासन विभागाने सांगितले..
रोज दोन ते अडीच हजार लीटर दूध संकलन होते. पण कोजागिरीच्या नियोजनासाठी तीन दिवसांपासून दूध संकलन करण्यात येत आहे.
- एस.बी. जांभुळे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी