तस्करी, कत्तल रोखली; १६३ गोवंशाची सुटका, ११ आरोपी ताब्यात
By प्रदीप भाकरे | Published: November 11, 2022 03:48 PM2022-11-11T15:48:48+5:302022-11-11T15:50:19+5:30
ताजनगर येथे धाड
अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ताजनगर येथील एका गोदामावर धाड टाकून कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल १६३ जनावरांची सुटका केली. कारवाईदरम्यान, ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक जण पसार झाला. ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. त्यासाठी नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांचे सहकार्य देखील लाभले.
नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर येथे खुल्या जागेतील टीन शेडच्या गोदामामध्ये दोन वाहनांतून मोठ्या प्रमाणात जनावरे कत्तलीसाठी आणण्यात आल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर धाड टाकण्यात आली. तेथून फकीर मोहम्मद अब्दुल रशीद (२७, रा. लालखडी), फुरकान अहेमद शेख गुलाम (२३, रा. समदनगर), अब्दुल अझहर अब्दुल नजीर (२८, रा. बिसमिल्लानगर), जावेद शहा मंदू शहा (१९, रा. अकबरनगर), शेख सोहेल शेख सुहान (२९, रा. छायानगर), मोहम्मद फरीद अब्दुल गफ्फार (४४, रा. गवळीपुरा), अशफाक अहेमद अब्दुल मुनाफ (५०, रा. हबीबनगर), साजीद अहेमद शब्बीर कुरेशी (३२, रा. छायानगर), अब्दुल जफर अब्दुल शकील (२८,रा. अलीमनगर), अब्दुल फईम अब्दुल खलील (४३, रा. पूर्णानगर) व मकसूद अहेमद अब्दुल जलील (४४, रा. अन्सारनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. तर गोदाम मालक शेख जाकीर शेख बब्बू (५०, रा. ताजनगर क्रमांक २ हा पसार झाला.
यांनी केली कारवाई
तेथून १६३ गोवशांची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मालवाहू वाहने व जनावरे असा एकूण २१ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर जनावरांना गोरक्षणमध्ये पाठविण्यात आले. विशेष पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक नायकवाडे, दीपक श्रीवास, सुरज चव्हाण, रोशन वऱ्हाडे, लखन कुशराज आदींनी ही कारवाई केली.