१६३ वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:47 PM2019-05-21T23:47:23+5:302019-05-21T23:47:34+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या १६३ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. १४ पंचायत समित्यांच्या विविध गावांत असलेल्या शाळांमधील या वर्गखोल्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यक आहे. यू-डायसनुसार सद्यस्थितीत सन २०१७-१८ मधील १६३ वर्गखोल्या दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या १६३ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. १४ पंचायत समित्यांच्या विविध गावांत असलेल्या शाळांमधील या वर्गखोल्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यक आहे. यू-डायसनुसार सद्यस्थितीत सन २०१७-१८ मधील १६३ वर्गखोल्या दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त वर्गखोल्यांचा प्रश्न मागील काही महिन्यांपासून भेडसावत आहे. यू-डायसनुसार शिकस्त वर्गखोल्यांची संख्या १६३ आहे. त्या धोकादायक ठरू शकतात. त्यांची दुरुस्ती ही पावसाळ्यापूर्वी करणे महत्त्वाचे आहे. विविध शालेय व्यवस्थापन समित्या, ग्रामपंचायत, शाळांनी वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे.
वर्गखोल्यांची दुरुस्ती करा
शिक्षण विभागातर्फे लाखो रुपये खर्चून विविध उपक्रम घेतले जातात. मात्र, जिल्हा शाळांच्या दुरुस्तीची यासाठी पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे एखादा उपक्रम कमी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्गखोल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
तालुकानिहाय दुरुस्ती
अचलपूर २०, अमरावती ९, भातकुली ११, चांदूर बाजार १४, अंजनागाव सुर्जी ११, चांदूर रेल्वे ५, चिखलदरा २८, दर्यापूर २८, धामणगाव ३, धारणी २१, मोर्शी २, नांदगाव खंडेश्वर १०, तिवसा ८ आणि वरूड ९ अशा १६३ वर्गखोल्या यू-डायसनुसार दुरुस्त करावयाच्या आहेत.