अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील १६४१ बालके तीव्र कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:27 PM2018-11-27T13:27:20+5:302018-11-27T13:28:39+5:30

कुपोषणमुक्तीकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी मेळघाटातील बालके या दुष्टचक्रातून बाहेर आलेली नाहीत.

1641 children of Melghat in Amravati district have severely malnourished | अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील १६४१ बालके तीव्र कुपोषित

अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील १६४१ बालके तीव्र कुपोषित

googlenewsNext
ठळक मुद्देअमृत आहाराची तपासणी गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्क
पंकज लायदे
अमरावती : कुपोषणमुक्तीकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी मेळघाटातील बालके या दुष्टचक्रातून बाहेर आलेली नाहीत. धारणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १६४१, तर आॅक्टोबर महिन्यात १५०२ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आढळून आली आहेत.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत दहा परिक्षेत्रांमध्ये २५१ अंगणवाडी केंद्रे आहेत. या अंगणवाडी केंद्रांमध्ये १६४१ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत असून, राज्य शासनाकडून कुपोषणमुक्तीकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ जात आहे. कुपोषणाचा मेलघाटला लागलेला कलंक मिटण्याच्या विचारातून शासनाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था काम करीत नसून, फक्त अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून कुपोषणमुक्ती करण्याचा प्रयत्न सुरूआहे.

परिक्षेत्रनिहाय कुपोषण
दुनी ८३, चाकर्दा १२०, कलमखार १५९, साद्राबाडी २६४, टिटम्बा २२२, बिजुधावडी २२२, धूळघाट रेल्वे १५५, बैरागड १३९, चटवाबोड १३२, हरिसाल १४५ अशी दहा परिक्षेत्रांतर्गत एकूण १६४१ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आहेत.

अमृत आहाराची तपासणी गरजेची
शासनाची राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना मेलघाटातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरू आहे. या योजनेतील आहार गर्भवती माता अंगणवाडी केंद्रातून घरी आणतात. घरी त्याचे सेवन गर्भवतींकडून होते की कुटुंबीयांकडून, याची माहितीच नसते. यासंदर्भात तपासणी गरजेची ठरली आहे.

कुपोषणमुक्तीच्या शासनाच्या योजना कुचकामी ठरल्या असून, ज्या योजना सुरू आहेत, त्यावर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नाही. आरोग्य विभाग, बालविकास प्रकल्प विभागातील रिक्त जागाही कुपोषणाला कारणीभूत आहेत.
- डॉ. रवि पटेल, सामाजिक कार्यकर्ता, धारणी (मेळघाट )

पावसाळ्यात कुपोषण वाढले होते त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी केंद्रांतर्गत व्हीसीडीसी सुरू करून मातेसह बाळाला सकस आहार पुरवून सुदृढ बनविणे सुरू आहे. शासनाच्या कुपोषणमुक्तीच्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे. कुपोषण नक्की कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
- प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती

Web Title: 1641 children of Melghat in Amravati district have severely malnourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट