फेसबुकच्या मैत्रीतून तरुणीस १६.५७ लाखांनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:57 PM2019-01-13T22:57:35+5:302019-01-13T22:58:12+5:30
फेसबुकवरून मैत्री करून व्यवसायासाठी मोठी रक्कम कमावून देण्याचे आमिष दाखवून १६ लाख ५७ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फेसबुकवरून मैत्री करून व्यवसायासाठी मोठी रक्कम कमावून देण्याचे आमिष दाखवून १६ लाख ५७ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली.
राधानगरातील एका तरुणीस २० सप्टेंबर २०१८ रोजी अॅलेक्स माशाल नावाच्या फेसबुकवरून फेन्ड रिक्वेक्ट आली. तिने ती स्वीकारली. दोघांचेही फेसबुकवर चॅटींग सुरू झाले. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. फेसबुकवरच दोघांनीही एकमेकांचा व्हॉट्सअप क्रमांक मिळविला. अॅलेक्सने अमेरिकेतील मोठ्या शिपिंग कंपनीत जनरल मॅनेजर असल्याचे तरुणीला सांगितले. त्याचा अमेरिकेत एक, तर लडंनमध्ये दोन बंगले असून तो विधूर असल्याचे तरुणीला सांगितले. त्यामुळे त्या तरुणीने अॅलेक्ससोबत संवाद सुरू ठेवला. दोघांनीही एकमेकांना आपल्या जीवनाची गाथा शेअर केली. तरुणीने अॅलेक्सला आपल्या नोकरीबाबत सांगितले. सध्या नोकरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे अॅलेक्स आपण व्यवसाय करून पैसे कमवू, असे तरुणीला सांगितले. त्यासाठी एक पार्सल पाठवितो, तो व्यवसाय सुरू कर, मी भारतात आल्यानंतर तो व्यवसाय कसा करावा, हे सांगेन, असे त्याने तरुणीला सांगितले. अॅलेक्सने तरुणीच्या व्हॉट्सअॅपवर कुरियरची एक चिठ्ठी पाठवून तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तीन दिवसांनंतर त्या तरुणीला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका महिलेचा कॉल आला. तुमचे पार्सल आले आहे. ते सोडवून घ्यायचे असेल, तर ३५ हजार रुपये भरावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्या तरुणीने पार्सल सोडविण्यासाठी ३५ हजार रुपये संबंधित बँक खात्यात भरले. दोन ते तीन दिवस झाले, मात्र, पार्सल आले नाही. त्यामुळे त्या तरुणीने विमानतळावरून आलेल्या त्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी संबंधित महिलेने पार्सलचे स्कॅनिंग झाले, त्यात डायमंड ज्वेलरी मिळाली आहे. याशिवाय ४० हजार डॉलर भेटले आहे. पार्सल सोडविण्यासाठी आणखी पैसे भरावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्या तरुणीने महिलेने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खाते क्रमांकावर रक्कम भरली. वेळोवेळी सूचनेप्रमाणे तिने १६ लाख ५७ हजार ५०० रुपये अॅलेक्सच्या म्हणण्यानुसार बँक खात्यात भरले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच सदर महिलेने सायबर ठाणे पोलिसांत शनिवारी रात्री तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित फेसबुकधारक आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४१६, ४१९, ४२०, ४३, ६६(ड) नुसार गुन्हा नोंदविला.
यापूर्वीही एक घटना
यापूर्वी शहरातील श्रीकृष्ण निरगुळे नामक व्यक्तीसोबतही असाच प्रकार घडला होता. संबंधित व्यक्तीने विदेशात नोकरी करीत असल्याची बतावणी करून श्रीकृष्ण निरगुळे यांच्याकडून लाखोंची रक्कम हडपली होती, हे येथे उल्लेखनीय.
सायबर गुन्हेगारांनी फेसबुकच्या माध्यमातून तरुणीशी मैत्री केली. विदेशातील बड्या कंपनीत असल्याची बतावणी करून व्यवसायाचे आमिष दाखवून वेळोवेळी बँकेत पैसे भरायला लावले.
- कांचन पांडे,
सहायक पोलीस निरीक्षक