१७ कोटींतून होणार तीर्थक्षेत्र, रस्ते विकास
By admin | Published: November 28, 2015 01:08 AM2015-11-28T01:08:40+5:302015-11-28T01:08:40+5:30
जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि रस्ते विकासाकरिता सुमारे १७ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
जिल्हा परिषद : बांधकाम समितीचा निर्णय
अमरावती : जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि रस्ते विकासाकरिता सुमारे १७ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून करावयाच्या कामांना जिल्हा परिषद बांधकाम समितीने शुक्रवारी पार पडलेल्या सभेत एकमताने मंजुरी दिली.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा विविध विषयाला अनुसरून शिक्षण व बांधकाम सभापती गिरीश कराळे यांच्या दालनात घेण्यात आली. सभेत जिल्हा परिषद बांधकाम समितीने ३०-५४ या लेखा शीर्षाखाली बांधकाम विभागाकडे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला १७ कोटी रूपयांच्या निधीतून तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे ६ कोटी तर रस्ते विकासाकरिता ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्ताव मागविले होते. यासाठी सदस्यांनी सुचविलेल्या आणि प्राप्त झालेल्या प्रस्तावास २७ नोव्हेंबर रोजी बांधकाम समितीने मान्यता देऊन दोन्ही कामांचा मार्ग मोकळा केला. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभापती कराळे यांनी मांडला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बांधकाम विभागाच्या इतरही कामांचा आढावा घेण्यात आला. सभेला समिती सदस्य प्रवीण घुईखेकर, प्रेमा खलोकार, श्रीपाल पाल, मोहन सिंगवी, विनोद डांगे, कार्यकारी अभियंता पी.जी.भागवत, उपअभियंता गावंडे, ठाकरे, भिलपवार, रायबोले आदींसह मंगेश मानकर, राजेश अडगोकार व बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)