अकोला ‘वाय पॉइंट’वरुन १७ लाख रुपये जप्त
By admin | Published: February 19, 2017 12:03 AM2017-02-19T00:03:19+5:302017-02-19T00:03:19+5:30
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने होणारे नगदी रकमेचे व्यवहार लक्षात घेता पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरू केली आहे.
निवडणुकीची पार्श्वभूमी : एसएसटीची कारवाई
अमरावती : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने होणारे नगदी रकमेचे व्यवहार लक्षात घेता पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरू केली आहे. तपासणीदरम्यान शनिवारी अकोला रस्त्यावरील ‘वाय पॉइंट’ येथून एका चारचाकी वाहनातून १३ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली. गुरुवारी बडनेरा हद्दीतील याच अकोला 'वाय' पॉइंट परिसरातून एका कारमधून ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होेती.
गुरुवारी नायब तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनात स्टॅटेस्टिक सर्र्व्हायलंस पथकातील मंडळ अधिकारी संतोष किल्लेकर, बडनेरा ठाण्याचे एएसआय गुलतकर, पो.काँ. सोनटक्के यांनी वाय पॉइंटवर एमएच २६-एएफ-२९०५ या क्रमांकाच्या कारची तपासणी केली. त्यामध्ये मोहम्मद सिध्दीकी पुंजानी (रा. कारंजा लाड) यांच्याजवळ ३ लाख ५० हजारांची रोख आढळून आली. या रोखीसंदर्भात पुंजानी यांच्याकडे कागदपत्रे आढळून आले नाही. त्याचप्रमाणे शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाहन मालक राजेशचंद्र रामदयाल मुंधडा (रा. कारजा लाड) यांच्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३७ -जी-७६०२ मध्ये १३ लाख ५० हजारांची रोख मिळून आली. ती रोख जप्त करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात बडनेरा पोलिसांनी सीआरपीसी कलम ४१,(१)(४)अन्वये कारवाई करून ती रोख जप्त केली.