कृषी सेवा केंद्रांचे १७ परवाने रद्द, १३ निलंबित; कृषी विभागाची धडक कारवाई, चार केंद्रचालकांना एसएओंची तंबी
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 14, 2024 22:21 IST2024-06-14T22:21:35+5:302024-06-14T22:21:48+5:30
या प्रकरणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासमक्ष सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्याद्वारा ही कारवाई करण्यात आली.

कृषी सेवा केंद्रांचे १७ परवाने रद्द, १३ निलंबित; कृषी विभागाची धडक कारवाई, चार केंद्रचालकांना एसएओंची तंबी
अमरावती : अनियमिततेसह बियाणांची एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री यासह अनेक कारणांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शुक्रवारी धडक कारवाई केली. यामध्ये १७ कृषिसेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले. २३ निलंबित, तर चार केंद्रचालकांना ताकीद देण्यात आली.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर एक व तालुक्यात १४ पथक गठित करण्यात आले आहे. या पथकांद्वारे सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली, शिवाय जादा दराने बियाणे विक्री करण्यात आल्याचेही प्रकार उघडकीस आले होते. या प्रकरणात गुरुवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपाशी बियाणे पाकिटांची दोनपेक्षा जास्त विक्री, साठ्याची नोंद नसणे, अपडेट न नसणे, परवान्यात स्रोत नमूद नसताना खत, कृषी निविष्ठांचा साठा आढळून येणे, केंद्राचे रेकाॅर्ड अपडेट नसणे याशिवाय अन्य कारणांसाठी जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येऊन म्हणणे मांडण्याची संधी केंद्रचालकांना देण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासमक्ष सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्याद्वारा ही कारवाई करण्यात आली.
चार तालुक्यांमधील केंद्रांवर कारवाई
भातकुली तालुक्यात बियाणे, खते व कीटकनाशकांचे प्रत्येकी दोन असे सहा परवाने रद्द करण्यात आले, तर सात निलंबित करण्यात आले. मोर्शी तालुक्यात बियाणांचे नऊ व दर्यापूर तालुक्यात दोन, परवाने रद्द करण्यात आले. शिवाय दर्यापूर तालुक्यात बियाणांचे ४ व भातकुली तालुक्यात ७ नांदगाव तालुक्यात २, असे १३ परवाने निलंबित करण्यात आलेले आहे. अमरावती तालुक्यात २, भातकुली व नांदगाव तालुक्यात प्रत्येकी १ अशा ४ केंद्रचालकांना ताकीद देण्यात आलेली आहे.