१७ टँकरने ३० गावात पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:47 AM2019-05-31T00:47:27+5:302019-05-31T00:47:50+5:30
चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या टँकरमुळे पाण्यासाठी वणवण भटकंती व पाण्यासाठी होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.
चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मान्सूनचे उशिरा आगमन पाहता संपूर्ण जून महिन्यापर्यंत ५० पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे.
तालुक्यातील आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, एकझिरा, बिहाली, कोहाना, भांद्री, खडीमल, गौलखेडा बाजार, कुलंगना, मोथा, पस्तलाई, नागझिरा, वस्तापूर, मोरगड, आलाडोह, शहापूर, अंबापाटी, खटकाली, झिंगापूर आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरडा, गंगारखेडा, हतरू, ढाणा, जैतादेही, वस्तापूर, जमलीआर, झिंगापूर, अंबापाटी, शहापूर आदी गावांमध्ये विहीर आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. खटकाली खोंगडा, रामटेक, बगदरी आदी गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींचा समावेश असून १६० पेक्षा अधिक गावे आहेत. त्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पाणी अडवा, पैसे जिरवा
कोट्यवधी रुपये खर्च करून मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु पाण्याची पातळी खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ असा मंत्र देत मेळघाटात ठिकठिकाणी नदी नाल्यांवर बंधारे आणि उंच-सखल भागावर सीसीटीची कामे करण्यात आलीत. प्रत्यक्षात ही सर्व कामे नामशेष झाल्याचे चित्र आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी न अडवता त्यातील पैसा स्वत:च्या खिशात जिरविल्याचा आरोप आहे.
हातपंप कोरडे, विहिरी आटल्या
तालुक्यात एकूण ३३७ हातपंप असून पाण्याची पातळी खोल गेल्याने ते हातपंप कोरडे पडले आहेत. ५० हातपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या हातपंपातून पाण्याचा उपसा होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.