गळा आवळून १७ वर्षीय युवकाचा खून; आजी, आजोबा, मावशीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 11:50 AM2022-05-25T11:50:24+5:302022-05-25T11:52:05+5:30
आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. आर्थिक कारणावरून नातवाची हत्या करण्यात आली.
मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील राजूरवाडी येथे एका १७ वर्षीय युवकाचा मृतदेह तारेच्या कंपाऊंडजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्याचा गळा आवळून खऊन करण्यात आल्याचे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास उघड झाले. याप्रकरणी आजोबा, आजी व मावशीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. मयूर राजेश लोहे (१७, रा. राजुरवाडी) असे मृताचे नाव आहे. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. आर्थिक कारणावरून नातवाची हत्या करण्यात आली.
मयूर हा राजुरवाडी येथे आईचे वडील असलेल्या आजोबा व आजींकडे राहत होता. त्याचे वडील नागपूर येथे राहतात. दरम्यान, २४ मे रोजी मयूर लोहे याचा मृतदेह गावातीलच भारतीय विद्यालयाच्या तारेच्या कंपाऊंडजवळ दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. तेथील पोलीस पाटील अतुल बोंडे यांनी याप्रकरणी शिरखेड पोलिसात फिर्याद नोंदविली. मोर्शीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीलेश पांडे, शिरखेडचे ठाणेदार हेमंत कडुकार व त्यांची अधिनस्त पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाली. या तरुण मुलाची गळा आवळून हत्या झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.
लगेच शिरखेड पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. तथा शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी श्वानपथकालासुद्धा पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे, शिरखेडचे ठाणेदार हेमंत कडुकार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. मनोज टप्पे, नीलेश देशमुख, रामेश्वर इंगोले, प्रभाकर चव्हाण, समीर मानकर, विजय टेकोडे, रमेश नेवारे यांनी घटनास्थळ गाठून मृताचा पंचनामा केला. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवून मयूर याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी त्याचा आजोबा गणपतराव उपासराव कंठाळे, मृताची आजी व मावशीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.
मयूरची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या आजोबासह दोन महिलांना अटक करण्यात आली.
नीलेश पांडे, एसडीपीओ, मोर्शी