अमरावती विभागातील १७५१ प्राथमिक दुग्धोत्पादक संस्था अवसायनात, १०२ कार्यरत, पुनरुज्जीवनाचे प्रयत्न शून्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 05:40 PM2017-11-06T17:40:16+5:302017-11-06T17:41:56+5:30
विभागात १९८० नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी आतापर्यंत १७५१ संस्था अवसायनात निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १२७ संस्था बंद झाल्या आहेत, तर अवघ्या १०२ संस्था सुुस्थितीत कार्यरत आहेत.
- संदीप मानकर
अमरावती : विभागात १९८० नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी आतापर्यंत १७५१ संस्था अवसायनात निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १२७ संस्था बंद झाल्या आहेत, तर अवघ्या १०२ संस्था सुुस्थितीत कार्यरत आहेत. अवसायनात निघालेल्या या संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी शासकीय दुग्धविकास यंत्रणा व विभागीय उपनिबंधकांकडून कुठलेही प्रयत्न झालेले नाहीत.
एकीकडे नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था बंद पडत आहेत. नोंदणीकृत सहकारी संस्था उद्देशाची पूर्तता करू शकत नसतील, तर त्या संस्था अवसायनात काढण्यात येतात. सदर संस्थांच्या पुनरुज्जीवनाकरिता अवसायकाकडून त्यासंबंधी प्रस्ताव व आॅडिट अहवाल सादर शासनाला सादर होतो. नोंदणीकृत संस्था बंद पडल्यास त्याची झिरो बॅलन्सशीट तयार करून नोंदणी किंवा नोंदणी क्रमांक रद्द करण्याचा अधिकार हा विभागीय उपनिबंधक (दुग्धोत्पादन) यांच्याकडे असतो. प्राथमिक दुग्धोत्पादन संस्था तात्पुरत्या स्वरूपात बंद असतात. संबंधित यंत्रणेला संस्थेने पत्रव्यवहार करून सहा महिने दूधपुरवठा नियमित केल्यास त्या पुन्हा सुरू होऊ शकतात, असे जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांनी सांगितले. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये यासाठी फारसे प्रयत्नच झाले नसल्याचे अवसायनात गेलेल्या संस्थांच्या संख्येवरून दिसून येत आहे.
अमरावती विभाग : दुग्धोत्पादक सहकारी संस्थांची जिल्हानिहाय स्थिती
जिल्हा नोंदणीकृत संस्था कार्यरत संस्था बंद संस्था अवसायनातील संस्था
अमरावती ५२३ ३८ ०१ ४८४
अकोला १७१ १३ ५४ १०४
वाशिम १११ ०४ ११ ९६
बुलडाणा ५८० २२ ५० ५०८
यवतमाळ ५९५ २५ ११ ५५९
एकूण १९८० १०२ १२७ १७५१
संस्थेने नियमित दूध संकलन सुरू करून पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव आमच्याकडे सादर केल्यास ती संस्था पुन्हा सुरू करण्यात येते.
-एस.पी. कांबळे,
विभागीय उपनिबंधक दुग्ध, अमरावती