कोरोनाकाळात कुटुंब नियोजनाच्या १ हजार ७७२ यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:05+5:302021-01-25T04:14:05+5:30
अमरावती/ राजुरा बाजार: कोरोनाकाळातही आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी क्षेत्र मिळून १ हजार ७७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून कुटुंब ...
अमरावती/ राजुरा बाजार: कोरोनाकाळातही आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी क्षेत्र मिळून १ हजार ७७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली आहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळातसुद्धा शहरी व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कुटुंब नियोजन सर्वेक्षण केले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण व प्राथमिक औषधोपचार केला आहे. राष्ट्रीय कार्यक्रम राबवित असताना लाभार्थींचा विश्वास संपादन करून त्यांना कुटुंब नियोजनाचे फायदे समजावून सांगून त्यासाठी प्रोत्साहित केले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा संवेदनशील विषय आहे. त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व भावनिक असे दूरगामी परिणाम समाज व्यवस्थेवर होत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाचा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून गणला जातो.
१४ तालुक्यांमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेण्यात आली. त्यात जिल्ह्यामध्ये एकूण ११७२ शस्त्रक्रिया झाल्या. त्यात पुरुष ५३ व स्त्री शस्त्रक्रिया १७१९ झाल्या आहेत. सगळीकडे कोविड १९ ची कामे सांभाळून न थकता अगदी जोमाने आरोग्य विभाग आपले कर्तव्य व कार्य पूर्ण करीत आहेत. कुटुंब कल्याण विभागातील प्रशासकीय अधिकारी सुभाष सिडाम, आरोग्य सहायक कुंभलवार, आरोग्य सेविका प्रीती तसरे हे काम सांभाळत असून, उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
कोट
लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलून लाभार्थींचे मतपरिवर्तन करणे व शस्त्रक्रियेसाठी तयार करणे हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचाच एक अविभाज्य घटक आहे. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी झाली.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी