अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांना मागितला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:10 PM2018-09-05T22:10:25+5:302018-09-05T22:10:49+5:30
बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार रवि राणा यांनी पणन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच प्रकरणात एक रीट याचिकादेखील न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार रवि राणा यांनी पणन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच प्रकरणात एक रीट याचिकादेखील न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अधिन राहून राज्य पणन मंडळाला अभिप्राय पाठविण्यासाठी अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस बजावून खुलासा व स्वयंस्पष्ट अहवाल मागितला आहे.
महाराष्ट्र कृषिउत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५ (अ) अंतर्गत येथील जिल्हा उपनिबंधकांनी अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांना २४ एप्रिल २०१८ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीसंदर्भात बाजार समितीचे संचालक अशोक दहिकर व इतर नऊ संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली असल्याने कार्यवाही करण्यापूर्वी राज्य पणन मंडळाशी आगाऊ विचारविनिमय करणे आवश्यक आहे. परंतु, रीट याचिकेवर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नसल्याने कार्यवाही करता येत नसल्याचे मत राज्य पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी १ आॅगस्टच्या पत्रान्वये स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने कार्यकारी संचालकांनी ३० आॅगस्ट २०१८ च्या पत्रान्वये या रीट याचिकेच्या अधिन राहून अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांचे खुलासे व इतर दस्तऐवज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे स्वंयस्पष्ट अहवालासह मागविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी या संचालकांना कलम ४५ (अ) अंतर्गत नोटीस बजावून खुलासे मागितले असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.