आंतरराज्यीय महाचोराकडून १८ लाख ८१ हजारांचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 08:47 PM2018-07-04T20:47:58+5:302018-07-04T20:48:12+5:30

दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात तरबेज किशोर तेजराव वायाळ (३५, रा. मेरा (बु.), ता. चिखली, जि. बुलडाणा) याच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ लाख ८१ हजार ७०० रुपये किमतीचे ६०७ गॅ्रम सोने जप्त केले.

18 lakh 81 thousand gold seized from thief | आंतरराज्यीय महाचोराकडून १८ लाख ८१ हजारांचे सोने जप्त

आंतरराज्यीय महाचोराकडून १८ लाख ८१ हजारांचे सोने जप्त

अमरावती -  दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात तरबेज किशोर तेजराव वायाळ (३५, रा. मेरा (बु.), ता. चिखली, जि. बुलडाणा) याच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ लाख ८१ हजार ७०० रुपये किमतीचे ६०७ गॅ्रम सोने जप्त केले. वर्षभरातील ही गुन्हे शाखेची सर्वात मोठी व धडाकेबाज कारवाई ठरली आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 काही महिन्यांपूर्वी अमरावतीत भरदिवसा घर व फ्लॅट फोडण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत होत्या. घरात कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर किशोर व त्याचा साथीदार लहु दगडू धंदरे (रा. रोहणा, जि. बुलडाणा) हे मुद्देमाल चोरून नेत होते. या चोºयांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, गुन्हे शाखेचे कर्तबगार पीएसआय राम गितेंच्या पथकाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात बारकाईने तपास केला आणि आरोपीला गजाआड करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. किशोरने पोलीस कोठडीदरम्यान बडनेरा, नांदगाव पेठ, गाडगेनगर, राजापेठ या ठाण्यांच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरलेला मुद्देमाल बुलडाणा जिल्ह्यातील सराफा बाजारात विकला. तो मुद्देमाल बुलडाण्यातील मेरा (बु.) व देऊळगाव मही येथील सराफा व्यावसायिकांकडून उपनिरीक्षक राम गिते, हवालदार प्रेम वानखडे, विनय मोहोड, पोलीस नाईक अमर बघेल, अजय मिश्रा, दिनेश नांदे, राजू आप्पा, पोलीस शिपाई सुलतान, इमरान, संग्राम भोजने, विनोद गाडेकर, चालक अमोल व रौराळे जप्त केला. 

'इन्स्टंट' चोरीत माहीर
कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या घरात चोरी करणारे अनेक चोरटे आहेत. मात्र, किशोर व त्याचा साथीदार हे केवळ 'इन्स्टंट' म्हणजे काही वेळेकरिताच बंद असलेल्या घरांना लक्ष्य करायचे.  पाच ते सात मिनिटांत घर फोडून मुद्देमाल लंपास करण्यात त्यांचा हातखंडा होता.

२०० हून अधिक चोरीचे गुन्हे 
किशोर वायाळ हा अट्टल चोरटा असून, त्याने महाराष्ट्रातील सोलापूर, जालना, अकोला तसेच गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

शहरात मध्यंतरी घरफोडी व चोरीचे गुन्हे वाढले होते. त्याअनुषंगाने बारकाईने व अभ्यासपूर्ण तपास करून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. पोलीस पथकाची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.  
दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती

Web Title: 18 lakh 81 thousand gold seized from thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.