महिला कर्मचाऱ्यांना मिळणार १८० दिवसांची विशेष रजा; एसटी महामंडळाचा निर्णय
By जितेंद्र दखने | Published: March 13, 2023 06:22 PM2023-03-13T18:22:52+5:302023-03-13T18:23:49+5:30
दत्तक मूल घेणाऱ्यासाठी सुविधा
अमरावती : मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून आता १८० दिवसांची विशेष रजा घेण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासंबंधी अधिकृत परिपत्रक विभागीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.
राज्य एसटी महामंडळाने महिलांसाठी घेतलेल्या निर्णयाने महिला कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने एसटी महामंडळाकडून विशेष भेट दिली आहे. महिलांबाबत घेण्यात आलेला हा निर्णय एसटी महामंडळाने पहिल्यांदाच घेतला आहे.
राज्य एसटी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने दत्तक घेतलेल्या बाळाचे संगोपन करण्यास समस्या निर्माण होत होती. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महिला कर्मचारी व विविध एसटी कर्मचारी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावर ८ मार्च रोजी राज्य एसटी महामंडळाकडून अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध जारी केले आहे. या पत्रानुसार आता एसटी महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. यामध्ये दत्तक घेण्यात येणाऱ्या बालकांचे वय एक महिन्याहून कमी असेल, तर एक वर्षाची रजा अनुज्ञेय राहील.
दत्तक मुलाचे वय सहा महिने आणि त्याहून जास्त, परंतु सात महिन्यांहून कमी असेल, तर सहा महिन्यांची रजा मिळेल. दत्तक मुलाचे वय नऊ महिने आणि त्याहून जास्त, परंतु १० महिन्यांहून कमी असेल, तर तीन महिन्यांची रजा मिळणार आहे.
दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना सदर विशेष रजा घेतल्यानंतर प्रसूती रजा, दत्तक मुलांसाठी तसेच सरोगसीसाठी असलेली विशेष रजा मंजूर होणार नाही. रजा घेण्यासाठी सेवा कालावधीची अट नाही. ज्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण नसल्यास त्यांनी संबंधित कार्यालयास रजेसाठी बंधपत्र (बाँड) द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या रजेकरिता महामंडळाने ठरवून दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर या रजेचा लाभ मिळणार आहे. महामंडळांनी घेतलेल्या या निर्णयाची महिला व कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.
महिला दिनानिमित्त महिलांसाठी १८० दिवसाची रजा मंजूर केली आहे. या निर्णयाचा महिला कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होईल. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- जया राऊत, संघटनप्रमुख महिला आघाडी, एसटी कामगार संघटना, अमरावती