कीटकनाशकांच्या फवारणीमुळे १८३ शेतकऱ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:27+5:302021-08-01T04:12:27+5:30

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे ...

183 farmers poisoned due to spraying of pesticides, two die | कीटकनाशकांच्या फवारणीमुळे १८३ शेतकऱ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे १८३ शेतकऱ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

googlenewsNext

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ शेतकरी-शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली व यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फवारणी करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याबाबतच्या टिप्स कृषी विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान विषबाधा झालेल्या १८३ पैकी १८१ जण उपचारानंतर बरे झाले. दोन मृतांचा व्हिसेरा अहवाल अप्राप्त असल्यामुळे अद्याप त्यांची नोंद कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यू अशी नोंद घेण्यात आलेली नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.

शेतात कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करतात. ते विषारी असल्यामुळे फवारणी करणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे गरज असल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी व शिफारस केलेलेच कीटकनाशक वापरावे. याशिवाय कीटकनाशके इतर रसायने किंवा खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नयेत. जखम असलेल्या व्यक्तींनी फवारणी करू नये. याशिवाय फवारणी करताना विडी, सिगरेट, गुटका किंवा तंबाखूचे सेवन करू नये. हवेच्या दिशेनेच फवारणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

पाईंटर

फवारणीमुळे विषबाधा जिल्हास्थिती

वर्षभरात दाखल रुग्ण : १८३

उपचारानंतर बरे : १८१

एकूण मृत्यू : ०२

बॉक्स

जैविक निविष्ठांचा वापर करूनही नियंत्रण

प्रत्येक वेळी कीटकनाशक फवारणीची आवश्यकता नाही. कीड व रोग कमी प्रमाणात असल्यास फेरोमेन सापळे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, यासारख्या जैविक निविष्ठांचाही वापर करून कीड व रोगांवर नियंत्रण मिळवता येते. पिकांचे नियमित सर्वेक्षण करून कीड व रोगांनी आर्थिक नुकसानपातळी ओलांडल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी लागते.

बॉक्स

ही आहेत लक्षणे

डोळे जळजळणे

चेहऱ्याची, पूर्ण शरीराची आग होणे

चक्कर येणे, उलट्या होणे

डोकेदुखी

बॉक्स

लाल रंगाचे पतंगाचे आकाराचे चिन्ह, जहाल विष

कीटकनाशकाच्या डब्यावर लाल रंगाचे पतंगाच्या आकाराचे चिन्ह असल्यास सर्वात विषारी असे दर्शविते. यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो. हिरव्या चिन्हाची कीटकनाशके सर्वात कमी विषारी असतात. फवारणीनंतर कीटकनाशकांच्या डब्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी व कीटकनाशकांच्या वापराची नोंद घ्यावी, असे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

ही काळजी आवश्यक

फवारणीदरम्यान त्वचा, डोळे व श्वसनेंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते. त्याचे अंगावरील कपडे त्वरित बदलावे. बाधित व्यक्तींचे अंग साबणाने स्वच्छ धुवावे. त्याला त्वरित वांती करायला लावावी. श्वासोच्छवास योग्य रीतीने होत आहे का, याची तपासणी करावी. बाधित व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. त्याला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये.

कोट

आवश्यकता असल्यासच कीटकनाशकांची फवारणी करावी. याशिवाय जैविक निविष्ठांचे पर्याय आवश्यक आहे. याद्वारे कीड/रोगांवर नियंत्रण मिळविता येते. फवारणी करायची झाल्यास शेतकरी/ शेतमजुरांनी पुरेशी काळजी घ्यावी.

- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: 183 farmers poisoned due to spraying of pesticides, two die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.