गुंतवणुकदारांचे शेअर्स परस्पर विकून १९ कोटी लाटले; एमडीसह सहा जणांविरुद्ध अमरावतीत गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 05:03 PM2022-07-30T17:03:06+5:302022-07-30T17:05:31+5:30
७९ जणांची फसवणूक
अमरावती : म्युच्युअल फंड व शेअर गुंतवणुकीची बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट व लेझर स्टेटमेंट बनवून येथील ७९ जणांचे शेअर परस्पर विकण्यात आले. यात गुंतवणुकदारांची तब्बल १८ कोटी ५६ लाख ७३ हजार ६३४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली.
नोव्हेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२० दरम्यान हा आर्थिक व्यवहार झाला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी २८ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता ऋषभ सिकची (२७, रा. बियाणी चौक, अमरावती) यांच्या तक्रारीवरून अनुग्रह स्टॉक ॲण्ड ब्रोकर प्रा. लिमिटेडचा संचालक परेश कारिया, तेजी-मंदी डॉट कॉमचा संचालक अनिल गांधी, एडलवेज कस्टोडियल सव्हिसेेस, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे एमडी विक्रम लिमये व चिफ रेग्युलेटरी ऑफिसर व सीडीएसएल (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड) विरुद्ध आर्थिक फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याच्या कलमान्वये गुुन्हा दाखल केला.
ऋषभ सिकची यांच्यासह अन्य ७९ स्थानिकांनी तेजी-मंदी डॉट कॉम मार्फत अनुग्रह स्टॉक ॲण्ड ब्रोकरकडे नगद व धनादेशाच्या स्वरूपात १८ कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविले. अनुग्रह स्टॉककडून त्या ७९ लोकांचे डीमॅट अकाउंट काढण्यात आले. त्या ७९ जणांनी शेअर ट्रेडिंगसाठी अनुग्रह स्टॉक ॲण्ड ब्रोकरला पावर ऑफ अटर्नी नेमले. एक-दीड वर्ष त्या गुंतवणूकदारांना नियमित परतावा देण्यात आला. मात्र, काही काळानंतर अनुग्रहला तोटा होऊ लागल्याने अनुग्रहने एडलवेज या कंपनीला कस्टोडियन नेमले. मात्र, अनुग्रहमुळे एडलवेजला तोटा झाला.
एनएसईकडून दुर्लक्ष
आपले शेअर्स परस्पर विकल्या गेल्याची बाब लक्षात येताच गुंतवणूकदारांनी एनएसईकडे धाव घेतली. तर सेबीने पडताळणी करून अनुग्रहवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र, एनएसईने दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात ते शेअर्स विकले गेलेे. तर अनुग्रह स्टॉक ॲण्ड ब्रोकरच्या शेअर ट्रेडिंगमधील अनियमिततेकडे (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने देखील दुर्लक्ष केले. त्यामुळे एनएसईसह सीडीएसएल या संस्थाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला. अनुग्रहने दोन लेझर अकाउंट बनविल्याने गुंतवणूकदारांना संकेतस्थळावर आपली रक्कम सुरक्षित असल्याचे दिसत आहे.
चार दिवसांपूर्वी डीजींकडून पत्र
याबाबत ऋषभ सिकची यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. तपास सुरू असतानाच अनुग्रहबाबतच्या फसवणुकीचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याने अमरावती पोलिसांनी तो थांबवावा, असे पत्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अमरावती पोलिसांना प्राप्त झाले. त्यामुळे तो तपास थांबला होता. मात्र, आता तुमच्याकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी आरंभावी, चौकशीअंती फसवणुकीची सिद्धता होत असल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शहर पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यानुसार अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला. आरोपींनी ७९ जणांचे बनावट शेअर्स स्टेटमेंट बनवून ते संकेतस्थळावर अपलोड करून खरे असल्याचे भासवून फसवणूक व विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.