१९ कैद्यांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आर्जव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:24 PM2017-09-21T23:24:18+5:302017-09-21T23:24:29+5:30
राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान कृषि कर्जमुक्ती योजनेतंर्गत येथील मध्यवर्ती कारागृहातील १९ कैद्यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन आर्जव केलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान कृषि कर्जमुक्ती योजनेतंर्गत येथील मध्यवर्ती कारागृहातील १९ कैद्यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन आर्जव केलेले आहे. कैद्यांना शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन लवाजाम्यासह कारागृहात पोहचले होते, हे विशेष.
कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांना जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या बंदीजनांचा शोध घेतला. त्यानुसार १९ व २० सप्टेंबर रोजी मध्यवर्ती कारागृहात १९ कैदी बांधवांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. कारागृहात विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असताना शासनाच्या शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याने कैद्यांच्या आनंदात भर पडली आहे. शासन निर्णयानुसार कोणताही शेतकरी हा कर्जमुक्तीपासून वंचित राहू नये, याकरिता शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. आॅनलाईन अर्ज भरुन घेताना जिल्हा प्रशासन चमुने कैद्यांच्या बोटांचे ठसे, आधार क्रमांक, कर्जाची रक्कम, डोळ्यांचे स्कॅनिंग आदी महत्वाची माहिती भरुन घेतली आहे. आॅनलाईन अर्ज भरुन घेताना प्रशासनाने सुसज्ज यंत्र सामग्री सोबत आणली होती. कैदी बांधवांना शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, तुरुंगाधिकारी बी.एस. सदांशिव, आर.जी. वडते आदींनी अथक परिश्रम घेतले. कारागृह प्रशासनाच्यावतीने कैद्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.