१९ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूका
By admin | Published: December 2, 2014 10:56 PM2014-12-02T22:56:32+5:302014-12-02T22:56:32+5:30
राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते एप्रिल २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि विभाजनामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
३५ जागा : २३ डिसेंबर रोजी मतदान , सायंकाळीच मतमोजणी
अमरावती : राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते एप्रिल २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि विभाजनामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील १४ आणि चांदूरबाजार तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींच्या अशा एकूण २५ जागांसाठी २३ डिसेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. याशिवाय मतदानाच्या दिवशीच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार चिखलदरा तालुक्यातील पोटनिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सोनापूर, रायपूर, केलपानी, सोमठाणा खु , टेंभु्रसोंडा, काजलडोह, आमझरी, हतरू, रूईपठार, अंबापाटी, चिचखेडा, आडनदी, बदनापूर, गौलखेडा बाजार आदी १९ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील मिर्झापूर, बेलोरा, सर्फापूर, कल्होडी, कोंडवर्धा या पाच ग्रामपंचायतीतसुध्दा पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत.
त्यामुळे या ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आहे. निवडणुकीचा आदेश प्राप्त होताच प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
जिल्हयात चिखलदरा व चांदूरबाजार या दोन तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी निवडणुकीची नोटीस जारी करण्यात आली आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन स्विकारणे ४ ते ८ डिसेंबर पर्यंत, ९ डिसेंबर रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी, ११ डिसेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. २३ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यत मतदान घेतले जाणार आहे.