सर्पदंश झालेल्या १९ महिन्याच्या चिमुकल्याला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:41+5:302021-07-01T04:10:41+5:30
नरेंद्र जावरे चिखलदरा : गांगरखेड्यातील भूमी या अवघ्या १९ महिन्यांच्या चिमुकलीला साप चावला. तिच्या पालकांनी वेळेत तिला काटकुंभ प्राथमिक ...
नरेंद्र जावरे
चिखलदरा : गांगरखेड्यातील भूमी या अवघ्या १९ महिन्यांच्या चिमुकलीला साप चावला. तिच्या पालकांनी वेळेत तिला काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. त्यामुळे या चिमुकलीचा जीव वाचू शकला. अँटिडोस हा सर्पदंशावर रामबाण उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी मांत्रिकाकडे न जाता सर्वप्रथम रुग्णालयात येऊन उपचार घेतले पाहिजेत, असे आवाहन या घटनेच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
देशात सर्पदंशाच्या सुमारे दोन लाख घटना घडतात, असा अंदाज आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तींना प्रथमोपचाराबरोबरच रुग्णालयात आणणेही तितकेच आवश्यक असते. सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण भागात घडतात. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. ग्रामीण भागात, शेतावर काम करणाऱ्यांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडतात. अशावेळी न घाबरता प्रसंगावधान राखून प्रथमोपचार केले पाहिजे व वेळेत रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. एकूण सर्पदंशापैकी ८० टक्के घटना या बिनविषारी सापाच्या असतात. अशावेळी हिंमत सोडता कामा नये. वेळेवर व योग्य वैद्यकीय उपचारांनी व्यक्तीचे प्राण वाचतात. २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात सर्पदंशाच्या १०८८ घटना घडल्या. त्यापैकी २९ व्यक्ती दगावल्या, अशी माहिती आरोग्य यंत्रणेद्वारे देण्यात आली.
---------------
योग्य वेळी आरोग्य केंद्राकडे धाव
गांगरखेडा येथील अवघ्या १९ महिन्यांची भूमी अर्जुन गाठे या चिमुकलीला शनिवारी सायंकाळी खेळत असताना साप चावला. त्यावेळी तिच्या पालकांनी तात्काळ जवळचे काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी बाळाची तपासणी करीत वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार इंजेक्शनद्वारे ॲन्टीडोस देऊन औषधोपचार केला. त्यामुळे भूमीचे प्राण वाचू शकले. आता तिची प्रकृती चांगली आहे.
----------------
योग्य व तत्पर प्रथमोपचारानेच रुग्ण वाचू शकतात. त्यामुळे तात्काळ अशा रुग्णाला दवाखान्यात नेले पाहिजे व नेत असताना प्रथमोपचार केले पाहिजे. लवचीक पट्टीने (इलॅस्टिक क्रेप बँडेज) हात किंवा पाय बांधावा. यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरणार नाही. कोणतेही तंत्रमंत्र किंवा नवस केल्याने सर्पविष उतरत नाही.
- डॉ. आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ
000