Amravati | तुझ्यासोबत टाईमपास केला ऐकले अन् ती फासावर झुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 13:23 IST2022-07-11T13:12:10+5:302022-07-11T13:23:46+5:30
मी तुझ्यासोबत टाईमपास केला. माझे तुझ्यावर प्रेम नसून, मला आता दुसरी मुलगी भेटली आहे, असे म्हणून त्याने लग्न करण्यास नकार दिला. प्रेमभंगाचे दु:ख सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले.

Amravati | तुझ्यासोबत टाईमपास केला ऐकले अन् ती फासावर झुलली
अमरावती : तुझ्यावर मी प्रेमबिम केलेले नाही, केवळ टाईमपास केला, असे म्हणून प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने १९ वर्षीय प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती घटना २८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी ८ जुलै रोजी वलगाव पोलिसांनी अमरावती येथील विशाल नामक तरुणाविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या त्या १९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या मर्गची चौकशी करीत असताना मृताच्या नातेवाइकाचे जबाब नोंदविण्यात आले. त्यात प्रेमसंबंध व प्रेमभंगाचा प्रकार उघड झाला. तक्रारीनुसार, आरोपी विशाल व १९ वर्षीय मुलीचे सुमारे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. संवाद वाढला. त्याने तिला लग्नाचे प्रलोभन दिले. दरम्यान, अलीकडे तो तिला टाळू लागला.
काही महिन्यांपूर्वी त्याने तिला स्पष्टच बजावले. मी तुझ्यासोबत टाईमपास केला. माझे तुझ्यावर प्रेम नसून, मला आता दुसरी मुलगी भेटली आहे, असे म्हणून त्याने लग्न करण्यास नकार दिला. तुझे नातेवाईक माझ्या नातेवाइकाशी का बोलले, त्याचा मी वचपा घेत असल्याचे त्याने सांगितले. लग्न करायचे नाही, असे तो ठामपणे बोलल्याने तिच्या मनावर परिणाम झाला. प्रेमभंगाचे दु:ख तिला सहन झाले नाही. त्यामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आरोपी कारणीभूत
आपली नातेवाईक असलेल्या तरुणीच्या आत्महत्येला आरोपी विशाल हा कारणीभूत असल्याचे मृताच्या नातेवाइकाने जबाबात स्पष्ट केले. तसा चौकशी अहवाल वलगावच्या ठाणेदारांकडे सोपविण्यात आला. अहवालाच्या अनुषंगाने ठाणेदारांनी दिलेले आदेश व मृताच्या नातेवाइकाने दिलेल्या जबाबावरून आरोपी विशालविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विजय गिते हे करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.