अस्मानी, सुलतानी संकटाचे १० हजार बळी दुर्लक्षित; संघर्षावर नैराश्य भारी, पश्चिम विदर्भातील वास्तव
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 21, 2023 02:51 PM2023-07-21T14:51:49+5:302023-07-21T14:53:00+5:30
आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू
अमरावती : पश्चिम विदर्भात सन २००१ पासून सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेल नाही, आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी ९०७७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत १०१४१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना शासन मदत मिळाली नसल्याचे वास्तव आहे. याशिवाय १८९ शेतकरी आत्महत्यांची अद्याप चौकशी करण्यात न आल्याने प्रलंबित आहेत.
राज्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १३ जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. या सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयातया अनुषंगाने कक्ष सुरु करण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारी, वसुलीचा तगादा, मुलिंचे लग्न याशिवाय अन्य कारणांनी नैराश्य येऊन शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहेत.
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात व त्याही अमरावती जिल्ह्यात होत आहे. विभागात २०२३ च्या सहा महिन्यात तब्बल ५४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २२७ प्रकरणे शासन मदतीला प्राप्त ठरली आहे. याशिवाय १३५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. अद्याप १८० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.