२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी दिली पायाभूत चाचणी, तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
By जितेंद्र दखने | Published: July 11, 2024 10:10 PM2024-07-11T22:10:25+5:302024-07-11T22:11:25+5:30
जिल्हाभरातील २५१३ शाळांत पॅट परीक्षा
जितेंद्र दखने, अमरावती: नव्या शैक्षणिक वर्षात तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी अनुदानित अशा २ हजार ५१३ शाळांतील सुमारे २ लाख ७१ हजार ६७३ विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी (पॅट)ला १० जुलैपासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी प्रथम भाषा विषयाची तर गुरुवारी गणित विषयाची परीक्षा घेण्यात आली आहे. ही चाचणी १२ जुलैपर्यंत घेतली जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या चाचण्यांमध्ये प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
अध्ययन निष्पती, मूलभूत क्षमतेच्या आधारावर चाचणी
या चाचण्या एकूण १० माध्यमांत होणार आहेत. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचणीचे आयोजन इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी केले आहे. चाचणीचा अभ्यासक्रम मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती, मूलभूत क्षमता यावर आधारित आहे.