१३ लाख बारकोड उत्तरपत्रिका पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:40 AM2019-08-24T01:40:45+5:302019-08-24T01:42:39+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन मूल्यांकनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल १३ लाख उत्तरपत्रिका भांडार विभागात पडून आहेत. गत दोन वर्षांपासून या उत्तरपत्रिका तशाच असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑनलाईन मूल्यांकनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल १३ लाख उत्तरपत्रिका भांडार विभागात पडून आहेत. गत दोन वर्षांपासून या उत्तरपत्रिका तशाच असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठात परीक्षा विभागाचा ऑनलाइन कारभार सुरू झाल्यानंतर सन २०१७ मध्ये २० लाख बारकोड उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यात आली होती. प्रतिउत्तरपत्रिका १४ रूपये याप्रमाणे २ कोटी ८० लाखांच्या बारकोड उत्तरपत्रिका मागविण्यात आल्या होत्या. सन २०१८-२०१९ या वर्षात परीक्षा ऑनलाइन प्रणालीने घेण्यात आल्यात. त्यामुळे पहिल्या वर्षी सात लाख बारकोड उत्तरपत्रिका ऑनलाइन परीक्षेसाठी वापरण्यात आल्या. मात्र, सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात आॅनलाईन परीक्षा व मूल्यांकन काही कारणास्तव गुंडाळण्यात आल्या आहेत. परिणाणी आता विद्यापीठाच्या भांडार विभागात १३ लाख बारकोड उत्तरपत्रिका तशाच पडून आहेत. या उत्तरपत्रिकांचे वापर न झाल्यास कालातंराने त्या निरूपयोगी तर ठरणार नाही, अशी चिंता भांडार विभागातील अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे. एकाच वेळी २० लाख बारकोड उत्तरपत्रिका खरेदी करण्यामागे नेमके काय कारण होते, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. बारकोड उत्तरपत्रिकांचा वापर हा ऑनलाइन परीक्षांसाठीच वापर होते. ऑफलाइन परीक्षांसाठी साध्या स्वरूपाचा उत्तरपत्रिका वापरल्या जातात. साध्या उत्तरपत्रिका ७ रूपये तर बारकोड उत्तरपत्रिकांचे बाजारमूल्य हे १४ रुपये आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या पैशाचा चुराडा चालविल्याचे दिसून येते. बारकोड उत्तरपत्रिका निरुपयोगी ठरू नये, यासाठी आता या उत्तरपत्रिका ऑफलाइन परीक्षेसाठी वापरण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.
वर्षभराने सुरू होणार ऑनलाईन परीक्षा
विद्यापीठात यंदा ऑनलाइन परीक्षा व मूल्यांकन प्रणालीला ब्रेक लावण्यात आला आहे. ऑनलाईन परीक्षेच्या एंड टू एंड कामांसाठी नव्याने एजन्सी शोधली जाणार आहे. निविदा प्रक्रिया, करारनामा आदी प्रशासकीय बाबी पूर्णत्वास येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. नव्याने शोधली जाणारी एजन्सीचे सॉफ्टवेअर आणि अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याविषयी भर दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.