३२ लाखांत विक्री झालेल्या जमिनीचे दोन कोटी प्राप्त
By admin | Published: November 18, 2015 12:25 AM2015-11-18T00:25:41+5:302015-11-18T00:25:41+5:30
स्व.रामराव दत्ताजी देशमुख चॅरीटी ट्रस्ट यांची अमरावती येथील जमीन ३२ लाखांत विक्री झाली. या जमिनीचे बाजारमूल्य तपासल्यावर ती जमीन दोन कोटी रुपयांत विक्री झाली.
कठोरा येथील धार्मिक स्थळ : धर्मदाय सहआयुक्तांमुळे संस्थेला लाभ
अमरावती : स्व.रामराव दत्ताजी देशमुख चॅरीटी ट्रस्ट यांची अमरावती येथील जमीन ३२ लाखांत विक्री झाली. या जमिनीचे बाजारमूल्य तपासल्यावर ती जमीन दोन कोटी रुपयांत विक्री झाली. याकडे धर्मदाय सहआयुक्तांनी लक्ष वेधल्याने संस्थेला १ कोटी ६८ लाखांचा लाभ झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी येथील स्व. रामराव दत्ताजी देशमुख चरिटी ट्रस्ट यांची मौजे कठोरा येथे जमीन होती. त्याकरिता संस्थेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पाच जणांनी निविदा सादर केल्यानंतर ३२ लाखांची निविदा संस्थेने मंजूर केली होती. त्या मोबदल्यात संस्थेची १ हेक्टर ४५ आर (३ एकर २४ गुंठे) जमीन विक्रीस संस्थेने मंजुरी दिली. जमीन विक्रीच्या परवानगीकरिता संस्थेचे सचिव सीमा लतीश देशमुख यांनी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात अर्ज केला होता. त्याअनुषंगाने धर्मदाय सहआयुक्त ओ.पी. जयस्वाल यांनी संस्थेच्या जमिनीची पाहणी केली. त्यामध्ये जमिनीची किंमत प्राप्त झालेल्या निविदेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे धर्मदाय सहआयुक्त जयस्वाल यांनी निरीक्षकामार्फत चौकशी सुरू केली. जमिनीचे बाजारमूल्य तपासणी व जमिनीची खरेदी करणाऱ्यांचा शोध घेऊन निविदा सादर करण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने नवीन निविदा काढण्यात आल्या. त्यामध्ये ३ जणांनी निविदा सादर केल्यात. त्या निविदा प्रभारी धर्मदाय सहआयुक्त मते यांच्या हस्ते उघडण्यात आल्यात. यामध्ये जुने निविदाधारक व नवीन निविदाधारकांना बोली लावण्यासाठी बोलविण्यात आले. त्यामध्ये उच्चतम बोली श्री बालाजी लॅन्ड डेव्हलपर्स यांनी लावली. धर्मदाय सहआयुक्त जयस्वाल यांच्या सतर्कमुळे संस्थेला हा लाभ मिळाला आहे. (प्रतिनिधी)