जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे
By जितेंद्र दखने | Published: December 4, 2023 08:13 PM2023-12-04T20:13:14+5:302023-12-04T20:13:24+5:30
४ हजारावर सेविका-मदतनीस संपात : शासकीय कर्मचारी दर्जाची मागणी
अमरावती: अंगणवाडी सेविकांना महिना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात सुमारे ४ हजार सेविका-मदतनीस सहभागी झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ५०० हजार अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबर वारंवार आंदोलने केलीत. परंतु, आश्वासनाशिवाय त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी,बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या नेतृत्वात राज्यव्यापी संप सुरू केला आहे. सोमवार हा आंदोलनाचा पहिला दिवस होता. या संपात २३१३ अंमणवाडी सेविका आणि २३१३ मदतनिस असे एकूण ४ हजार ६२६ कर्मचारी यात सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्या अनुषंगाने वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. यासाठी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी. कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करुन तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा अशा विविध मागण्यांसाठी संप सुरु असल्याचे अंगणवाडी,बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
आ. रोहीत पवारांची घेतली भेट
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांनी आपल्या न्यायीक मागण्यासाठी सोमवार ४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.अंगणवाडी व मदतनीस यांच्या शासन दरबारी अनेक मागण्या प्रलंबीत आहे.या मागण्याच्या पुर्ततेसाठी संपकरीअंगणवाडी सेविकांनी सध्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वातील संघर्ष यात्रा जिल्ह्यात दाखल झाली आहे.या यात्रेत पापळ येथे आ.रोहीत पवार यांना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मागणीचे निवेदन देवून मागण्याकडे लक्ष वेधले.