२० कीर्तनकार देणार कुपोषणमुक्तीसाठी सेवा
By admin | Published: January 15, 2017 12:11 AM2017-01-15T00:11:14+5:302017-01-15T00:11:14+5:30
आदिवासी बहुल, दुर्गम भागात अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आहे. हा पगडा दूर करण्यासाठी आता आरोग्य विभागाद्वारा कीर्तनकारांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.
जनजागृती : अंधश्रद्धा मिटविण्याचा आरोग्य यंत्रणेचा प्रयास
अमरावती : आदिवासी बहुल, दुर्गम भागात अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आहे. हा पगडा दूर करण्यासाठी आता आरोग्य विभागाद्वारा कीर्तनकारांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २० कीर्तनकारांची निवड करण्यात आलेली आहे. ते या दुर्गम भागात अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धेचा समुळ नाश करण्यासाठी आरोग्याचा जागर करणार आहे.
अंधश्रद्धेमुळे आदिवासी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या आदिवासींवर ‘भुमका’चा प्रभाव अधिक असल्याने अंधश्रद्धा वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे या दुर्गम भागातील माता व बाल मृत्यूचा दर कमी करण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे. त्यामुळे युनिसेफद्वारा राबविण्यात येणाऱ्या आरोग्य प्रकल्पामध्ये कीर्तनकारांची सेवा या कामी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात वडीलधाऱ्या व्यक्तींचे ऐकल्या जाते. त्यामुळे परिवारातील वडीलधारी व्यक्ती जागृत झाल्यास कुटूंबही सज्ञान होण्यास मदत होणार आहे. समाजमनावर कीर्तनकारांच्या जागृतीचा सकारात्मक परिणाम लक्षात घेता शासनाने हा पर्याय निवडला आहे. अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोदले यांच्या सहकार्याने कुपोषणग्रस्त जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात २० कीर्तनकारांची मदत घेण्यात येत आहे व या सर्व कीर्तनकारांना महसूल विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षित करण्यात येत आहे. या कीर्तनकारांना महसूल विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मानवी जीवनात गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत हे हजार दिवस आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात त्याच काळात बाळाच्या शरीराची आणि बुद्धीची बांधणी होते. त्यामुळे या काळात महत्वाची काळजी घ्यावी लागते व यासाठी कीर्तनकाराच्या माध्यमातून आरोग्य विषयक समस्यांचा जागर करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
संताच्या शिकवणीतून करणार आरोग्याचा जागर
पहिल्या टप्प्यात अमरावती विभागासह औरंगाबाद व नागपूर जिल्ह्यातील कीर्तनकारांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या कीर्तनकारासाठी युनिसेफ व आरोग्य विभागाने स्वतंत्र पुस्तिका तयार केली आहे. यामध्ये कोणत्या अनिष्ट प्रथा व रुढीपरंपरा आरोग्याला बाधक आहेत याची माहिती संताच्या शिकवणीतून देण्यात आलेली आहे.