वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना आता 20 लाखांची आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 02:15 PM2022-09-18T14:15:00+5:302022-09-18T14:15:39+5:30
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना वनविभागाकडून शासनाची अल्प प्रमाणात मदत मिळत होती.
अमरावती - वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या दुर्घटना घडत आहेत. त्यातच बिबट्याचा वावर मानवी वस्तीत सातत्याने होत असून बिबट्याच्या हल्ल्यांचं प्रमाणही वाढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. यापूर्वी, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना वनविभागाकडून शासनाची अल्प प्रमाणात मदत मिळत होती.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आधी 15 लाख रुपये एवढी मदत मिळत असताना ती मदत कमी असून ती 15 लाखाहून 20 लाख रुपये करण्यात यावी,अशी मागणी अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आ. प्रविण पोटे पाटील यांनी राज्य शासनाकडे केली होती. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दखल घेऊन वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्याचे परिवारास आता १५ लाखा ऐवजी २० लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. याबाबतचे आदेश वनमंत्रालयाकडून जारीही करण्यात आले आहेत.
याबाबत स्वत: ना. सुधिर मुनगंटीवार यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांना पत्राद्वारे माहिती कळविली आहे. या पत्रात असेही दर्शविले आहे की, जर कोणत्याही व्यक्तीचा वन्य प्राण्याने हल्ला केल्यास मृत्यू झाला तर त्याच्या परिवारास त्वरीत १० लाख रुपयाची मदत करण्यात येईल. तसेच उर्वरित १० लाख रुपयाची रक्कम त्याच्या संयुक्त बँक खात्यात फिक्स डिपॉजिटमध्ये जमा करण्यात येईल. जेणेकरुन मृतकाच्या परिवारास दरमहा व्याजाची रक्कम मदत मिळेल. तसेच, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये व गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपयाची मदत देण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री आमदार प्रवीण पोटे यांनी दिली.