१.७३ कोटी दस्तऐवजात कुणबी जातीच्या २० लाख नोंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:44 PM2023-11-25T16:44:31+5:302023-11-25T16:44:49+5:30
१३ यंत्रणांद्वारा तपासणी : कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशी एकही नोंद नाही
गजानन मोहोड
अमरावती : मराठा आरक्षणाचा अनुषंगाने कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये जुने पुरावे आवश्यक आहेत. यासाठी पश्चिम विदर्भात शासनाच्या १३ यंत्रणांद्वारा तब्बल १,७२,४६,८९५ कागदपत्रांची आतापर्यंत पाहणी करण्यात आली. यामध्ये कुणबी जातीच्या २०,०६,४१३ नोंदी आढळून आल्या आहेत. याशिवाय कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशी एकही नोंद आढळली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे व समितीच्या सदस्यांद्वारा येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पाचही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ही माहिती समोर आलेली आहे.
समितीने दोन प्रकारच्या नमुन्यात माहिती मागितलेली आहे. यामध्ये सन १९४८ पूर्वीचे व सन १९६७ पूर्वीच्या नोंदींचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय काही जुन्या नोंदी मोडी लिपीमध्ये आहेत. त्याचीदेखील पडताळणी तज्ज्ञांद्वारा केली जात आहे. शासकीय विभागाकडे विशेषत: महसूल विभागाकडे असलेल्या अभिलेख्यांममधील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदीची तपासणी अमरावती विभागात सध्या सुरू आहे.
तपासलेले अभिलेखे, कुणबी जातीच्या नोंदी
जिल्हा तपासलेल्या नोंदी कुणबी जातीच्या नोंदी
अकोला २८,११,३४९ ३,७२,८८४
अमरावती २८,३६,३३२ ४,७७,८५४
बुलडाणा ४८,८५,५७० ४,८१,१२५
वाशिम २३,११,६१९ २,०५,६८७
यवतमाळ ४४,०२,०३५ ४,६८,८६३
एकूण १,७२,४६,८९५ २०,०६,४१३
पुरावे तपासणीसाठी दोन कालखंडात विभागणी
कुणवी जातीचे पुरावे तपासणीसाठी दोन कालखंडातील अभिलेख्यांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील ९६,९८,३२० नोंदी तपासण्यात आल्यात. यामध्ये कुणबी जातीच्या ९,४१,३२६ नोंदी आढळल्या. याशिवाय सन १९४८ च्या पूर्वीच्या कालावधीतील ७५,४८,५७५ नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये कुणबी जातीच्या २०,०६,४१३ नोंदी सापडल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.