२० लाखांचा जमीन महसूल होणार माफ !
By admin | Published: November 22, 2015 12:15 AM2015-11-22T00:15:12+5:302015-11-22T00:15:12+5:30
जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्याचा नोव्हेंबर अखेर दुष्काळ यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.
दुष्काळात दिलासा : १ लाख १५ हजार शेतकऱ्यांना लाभाचे संकेत
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्याचा नोव्हेंबर अखेर दुष्काळ यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ एकरांवर शेती असलेल्या १ लाख १४ हजार ८०४ शेतकऱ्यांचा २० लाखांवर जमीन महसूल माफ होण्याचे संकेत आहे.
जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी पैसेवारी ही ५० पैशाचे आत आली आहे. मागील वर्षी पैसेवारी ही ४३ पैसे होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा जमीन महसूल माफ करण्यात आला होता. या वर्षी ६ नोव्हेंबरला खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या महसुलात सूट मिळण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी शासन स्तरावर अधिकृत घोषणेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
५ एकरांखालील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी आहेत. व ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांकडून शेतसारा वसूल केला जात नाही. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सामान्य जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल, संकिर्ण महसुलासह अन्य महसूल वसुली करीत असते. यापैकी सामान्य जमीन महसूल हा प्रती शेतकरी तालुकानिहाय वेगळा असला तरी प्रती एकर २० रुपयांच्यादरम्यान असतो. जिल्ह्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने १९६७ गावांमधील २० लाखांवर महसूल माफ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे आॅक्टोबर ते नोव्हेंबरपासून तलाठी महसूल गोळा करतात. मार्च अखेरपर्यंत शेतसारा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र कमी पैसेवारी असल्याने जमीन महसुलात सूट मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.