घरातून २०० ग्रॅम सोने चोरले; त्रिकूट दहा महिन्यांनी पकडले
By प्रदीप भाकरे | Published: August 3, 2024 01:02 PM2024-08-03T13:02:41+5:302024-08-03T13:16:23+5:30
Amravati : चार गुन्हे उघड, १०. ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त, क्राईम युनिट दोनची कारवाई
अमरावती : स्थानिक भिवापूरकर लेआउट महेश भवन येथील रहिवाशी विजय विश्वेश्वर चौधरी यांच्या घरातून तब्बल २०० ग्रॅम सोन्याचे व ८० ग्रॅम सोन्याचे दागिणे चोरीला गेले होते. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास तो प्रकार उघड झाला होता. त्याप्रकरणी तब्बल दहा महिन्यांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या आरोपींनी चौधरी यांच्याकडील चोरीसह बडनेरा पोलिसांत नोंद तीन अशा एकुण चार गुन्हयांची कबुली दिली आहे. आरोपींकडून १०. ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट दोनने शनिवारी ही यशस्वी कारवाई केली.
६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास विजय विश्वेश्वर चौधरी हे घराला कुलुप लावुन ईलेक्ट्रिक बिल भरण्याकरीता गेले. दुपारी दिडच्या सुमारास घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला होता. त्या २०० ग्रॅम सोने व ८० ग्रॅमची चांदी किंमत तत्कालिन ठाणेदार सीमा दाताळकर केवळ २.६७ लाख रुपये इतकी तोडकी लावली होती. राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्हयाचा समातंर तपास करीत असतांना अक्षय दिनेशकुमार गुप्ता (२५ वर्ष रा. चनकापूर, नागपूर), चेतन मनोज बुरडे (वय २३, रा. नंदनवन, नागपुर) व शुभम श्रीधर डुंबरे (वय ३०, रा. नंदनवन नागपुर) यांना या गुन्हयात अटक करून त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी येथे चार गुन्हे केल्याची कबुली दिली. तीनही आरोपींकडून एकूण १४७ ग्राम सोन्याची लगड व ५० ग्राम चांदीची लगड जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील व गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगाले व सत्यवान भुयारकर, उपनिरिक्षक संजय वानखडे, पोलीस अंमलदार मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, अमर कराळे, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, संदीप खंडारे यांनी ही कारवाई केली.