२०० शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:36 PM2019-01-21T23:36:57+5:302019-01-21T23:37:24+5:30

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियंत्रणात १४ तालुक्यांत ग्रामीण भागात सुमारे १६०० शाळा आहेत. यात २०० शाळांच्या वर्गखोल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. अशा शिकस्त वर्गखोल्यांतूनच आजही विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गत आठवड्यात भातकुली तालुक्यातील आष्टी येथे शाळेत भिंत पडून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी जखमी झाले होते. त्यामुळे शिकस्त वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

200 school squares are dangerous | २०० शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक

२०० शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक

Next
ठळक मुद्देचिमुकले धोक्यात : जि.प.ला केव्हा येणार जाग; बांधकाम, दुरुस्तीची प्रतीक्षा

जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियंत्रणात १४ तालुक्यांत ग्रामीण भागात सुमारे १६०० शाळा आहेत. यात २०० शाळांच्या वर्गखोल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. अशा शिकस्त वर्गखोल्यांतूनच आजही विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गत आठवड्यात भातकुली तालुक्यातील आष्टी येथे शाळेत भिंत पडून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी जखमी झाले होते. त्यामुळे शिकस्त वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासन गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी विविध उपक्रम राबविते. मराठीसह इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आणि डिजिटल वर्गखोल्या निर्मितीकडे भर आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल २०० शाळांच्या वर्गखोल्यांची स्थिती भयावह झाली आहे. काही शाळांचे छत कधी कोसळेल, हे सांगता येत नसल्याची माहिती एका मुख्याध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती काय करते, असा सवाल त्यानिमित्त उपस्थित होत आहे. शिक्षणावर सर्वाधिक बजेट आहे. तरीही वर्गखोल्यांची अवस्था अशी का, याचे मंथन जिल्हा परिषदेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
‘जिल्हा परिषदेच्या शाळा खासगीपेक्षाही सरस’ असा अहवाल १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाºया ‘प्रथम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेचावतीने प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणाºया ‘असर’मार्फत राज्यस्तरावर पाहणी करण्यात आली. मात्र, ग्रामीण क्षेत्रात २०० शाळांच्या वर्गखोल्यांची स्थिती बघता, अमरावती जिल्हा परिषद यात माघारल्याचे दिसून येते.
काही वर्षांपूर्वी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना (माहुरा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराचे पिल्लर कोसळल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परिणामी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वर्गखोल्याचा कायापालट कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा मोडकळीस आल्या आहेत. शिकस्त वर्गखोल्याची परिस्थिती ही दोन ते तीन वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. सन २०१६- २०१७ पासून जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील शिकस्त वर्गखोल्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. काही शाळांमध्ये वर्गखोल्या शिकस्त असल्याने एकाच वर्गात दोन वर्ग भरविले जातात. या शिकस्त वर्गखोल्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीविताशी कधीही खेळ करू शकतात, असे वास्तव आहे. सन २०१८ ते २०२० या वर्षात शिक्षण विभागाकडे नवीन वर्गखोल्याचे बांधकाम, शाळा दुरुस्ती, संरक्षण भिंत, शौचालय बांधकाम आदींसाठी प्रस्ताव आले आहे. शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती व बांधकाम याविषयी अनेकदा शिक्षण समिती, सर्वसाधारण सभेत ठराव घेतले. मात्र, अंमलबजावणीचे घोडे अडले आहे.
केव्हा पालटणार चित्र ?
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाºया अनेक शाळा व वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थी अशाच जीवघेण्या इमारतीत ज्ञान संपादन करीत आहेत. त्यामुळे अशा शाळा आणि वर्गखोल्याचे चित्र केव्हा पालटणार.
टाकरखेडा संभू येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळण्याच्या स्थितीत
भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू स्थित जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारातील सुरक्षाभिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या शाळेत बालवाडी ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिकतात. अनेकदा शाळकरी मुले भिंतीजवळ खेळतात. त्यातच वर्दळीच्या टाकरखेडा संभू ते रामा मार्गात ही शाळा आहे. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक अनेकदा भिंतीजवळ उभे राहतात. भिंतीला तडे गेल्यामुळे ती कधी कोसळेल, याचा नेम नाही. मात्र, या गंभीर बाबीकडे शाळा प्रशासनासह जिल्हा परिषदेनेही दुर्लक्ष चालविले आहे.

वर्गखोल्यांच्या किरकोळ व मेजर दुरुस्तीसाठी दोन वर्षांपासून निधी मिळाला नाही. अशातच आलेला निधी हा दायित्वावर खर्च झाला आहे. शाळा दुरुस्तीसंदर्भात निधी व न्यायालयीन अडचणी यामुळे ही कामे होऊ शकत नाही. ती पूर्ण करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- जयंत देशमुख, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

Web Title: 200 school squares are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.