निराधार योजनांचे २००० बोगस लाभार्थी
By admin | Published: January 10, 2015 12:07 AM2015-01-10T00:07:53+5:302015-01-10T00:07:53+5:30
शेकडो बोगस लाभार्थ्यांना खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे शासनाच्या विविध निराधार योजनांचे अनुदान मिळवून देणाऱ्या स्थानिक तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश ...
राजेश मालवीय धारणी
शेकडो बोगस लाभार्थ्यांना खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे शासनाच्या विविध निराधार योजनांचे अनुदान मिळवून देणाऱ्या स्थानिक तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्तेंनी दिले आहेत. यामध्ये समाविष्ट दलाल, वयाचे खोटे दाखले देणारे वैद्यकीय अधिकारी, तलाठी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे तब्बल २ हजारच्या जवळपास लाभार्थी असल्याची तक्रार ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तालुक्यातील काही वयोवृध्द लाभार्थ्यांनी दिली होती. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृध्दापकाळ, राजीव गांधी आदी योजना राबविल्या जातात. येथील नायब तहसीलदार, वरिष्ठ, कनिष्ठ, लिपिकांनी दलालांमार्फत २५ ते ४५ वर्षे वयोगटातील शेकडो बोगस लाभार्थ्यांना खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे योजनेचे अनुदान मिळवून दिले. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली.
बोगस कागदपत्रे पुरविणारे रॅकेट सक्रिय
वयाचे खोटे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयात बैरागड, हरीसाल, धारणी येथील १० दलालांचे रॅकेट सक्रिय आहे. या दलालांनी नवयुवकांना योजनेत बसविण्यासाठी खोटे दाखले मिळवून देणे, बोगस आधार कार्ड बनविणे, या संपूर्ण प्रकाराला संमती देणारे वैद्यकीय अधिकारी, तलाठी, रक्कम वाटप करणारे बँकेचे व्यवस्थापक, यांचाही या रॅकेटमध्ये समावेश आहे. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास अनेक तथ्य हाती लागू शकतात.