जिल्ह्यात डेंग्यूचे 201 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 05:00 AM2021-09-06T05:00:00+5:302021-09-06T05:00:59+5:30

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १६७० डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. यामध्ये महानगरात ६ आणि १३ तालुक्यात १९५ डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील डेंग्यूचे रुग्णांचा हा आकडा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

201 dengue positive in the district | जिल्ह्यात डेंग्यूचे 201 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात डेंग्यूचे 201 पॉझिटिव्ह

Next

इंदल चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत १६७० रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०१ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले, तर डेंग्यू संशयित नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाची उपाययोजना करताना तारांबळ उडाली आहे.
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १६७० डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. यामध्ये महानगरात ६ आणि १३ तालुक्यात १९५ डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील डेंग्यूचे रुग्णांचा हा आकडा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसामुळे सर्वच भागात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामध्ये डेंग्यू आजाराच्या रुग्णांत वाढ झालेली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच आरोग्य कर्मचारी, आशा, स्वयंसेविकांद्वारा ग्रामीण भागात व शहरी आरोग्य केंद्रनिहाय, वाॅर्डनिहाय, घरोघरी पाहणी केली जात आहे. डास उत्पत्तीचे स्थान टेमिफॉसने नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.

डेंग्यूबाधित गावात धूर फवारणी
ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले, तेथे आठवड्यातून दोन वेळा धूर फवारणी केली जात आहे. पावसाचे पाणी साचलेल्या डबक्यात गप्पी मासे सोडण्यात येत आहे. आजार बऱ्यापैकी कमी होण्यास यामुळे मदत झाल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली.

खुले प्लॉटवर फवारणीचा देखावा
महानगरात सध्या ६ डेंग्यू पॉझिटिव्ह शासनदरबारी असले तरी खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. शहरातील अनेक भागातील खुले प्लॉट डास उत्पत्तीची स्थळे बनली आहेत.

सध्या विषाणूजन्य आजाराची साथ सुरू आहे. यावर आरोग्य प्रशासन काम करीत आहे. नागरिकांनीही घराशेजारी साचलेले पाण्याचे डबके कोरडे करावे. टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावावी. झोपताना मच्छरदाणी, धूप अगरबत्ती, लिक्विडचा वापर करावा. शासनाकडून उपाययोजना सुरू आहेच.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

 

Web Title: 201 dengue positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.