२०६ पोलीस कर्मचारी आजारी
By admin | Published: March 9, 2016 01:11 AM2016-03-09T01:11:53+5:302016-03-09T01:11:53+5:30
पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. ...
अमरावती : पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. या अहवालातून २०६ पोलीस कर्मचारी आजारी असल्याचे स्पष्ट झाले. दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचे निदान झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
महिनाभरात पोलीस विभागातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमिवर पोलीस विभागातर्फे वसंत हॉल येथे शुक्रवारी आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. त्यामध्ये ४७८ पोलिसांच्या आरोग्या संबंधी विविध तपासण्या करण्यात आल्यात. ४० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोेगटातील कर्मचाऱ्यांच्या विविध आरोग्य चाचण्या इर्विनमधील डॉक्टर व परिचारिकांमार्फत करण्यात आल्यात. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ भागवत यांच्यामार्फत पोलिसांच्या काही चाचण्या घेण्यात आल्यात. त्यामध्ये १५० पोलीस कर्मचाऱ्यांचे ईसीजी, ३५० कर्मचाऱ्यांची मधुमेह तपासणी व २४७ जणांची ‘लिपिट प्रोफाईल’तपासणी करण्यात आली.
तपासणी अहवालातून २०६ पोलीस कर्मचारी विविध आजारामच्या विळख्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये १०१ पुरुष तर ५ महिला कर्मचाऱ्यांना पूर्वीपासूनच उच्च रक्तदाब असल्याचा निष्कर्ष निघाला ५६ कर्मचारी मधुमेहाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
तपासणी दरम्यान हृदयविकाराचे १० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी दोन रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहर पोलीस विभागात १ हजार ८३९ पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापुढेही वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी हा प्रयोेग आहे.