२१ हजार खातेदार ‘पीएम किसान’मधून बाद; ई-केवायसी नाही, थांबला सहा हजारांचा लाभ
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 3, 2023 04:58 PM2023-10-03T16:58:50+5:302023-10-03T17:01:00+5:30
कृषी विभागाची कारवाई
अमरावती : पीएम किसान सन्मान योजनेमध्ये शेतकरी खातेदाराला ई- केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. यासाठी शासनान पाच वेळा मुदतवाढ दिली, मात्र २११९३ खातेदारांनी अद्यापही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे त्यांचा लाभ थांबविण्यात आलेला आहे व आता या खातेदारांची नावे यादीतून कमी करण्यात येत आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजारांचा लाभ दिल्या जातो. या योजनेचे १४ हप्ते आतापर्यंत वितरित झालेले आहे. या योजनेत अपात्र शेतकऱ्यांचा शिरकाव झाल्याने त्यांचा लाभ थांबविण्यात येऊन रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याशिवाय लाभार्थ्यांना आधार लिंक व ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
यासाठी शासनाने तब्बल पाच वेळा मुदतवाढ दिली. याशिवाय योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये कृषी विभागाकडे जबाबदारी आल्यानंतर लाभार्थ्यांनी ईकेवायसी करावी, यासाठी गावागावात शिबिरे घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २,६४,९९५ खातेदारांनी ही प्रक्रिया केली आहे याची ९३ टक्केवारी आहे. अद्याप २११९३ खातेदार वारंवार सूचना करुनही प्रलंबित राहिल्याने ही नावे आता बाद करण्यात येत आहे.