वऱ्हाडातील २१ हजार पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:23 AM2018-04-06T11:23:48+5:302018-04-06T11:23:56+5:30

21 thousand water samples of Varhad are contaminated | वऱ्हाडातील २१ हजार पाणी नमुने दूषित

वऱ्हाडातील २१ हजार पाणी नमुने दूषित

Next
ठळक मुद्दे२८ प्रयोगशाळांमध्ये तपासणीरासायनिक, जैविक चाचण्यांमधून स्पष्ट

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही नमुन्यांत फ्लोराईड हा धोकादायक घटक आढळला.
पाण्यात विरघळलेले रासायनिक घटक आणि पाण्यात संचार करणारे सूक्ष्म जीवजंतू मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. या परिणामांना आळा घालण्यासाठी पाणी प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती करून त्यावर उपाययोजना करणे अगत्याचे ठरते. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत रासायनिक ३१,७२४ व जैविक ४४,२३९ अशा एकूण ७६, ४५३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.
यामध्ये १३,८१६ रासायनिक व ७,३३१ जैैविक असे एकूण २१,१४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
रासायनिक व जैविक पृथ:करण कामात अचुकता व सातत्य असल्यामुळे येथील विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला ‘राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रमाणपत्र’ (एनएबीएल) मानांकन प्राप्त आहे. अमरावती विभागात विभागस्तरावर १, जिल्हास्तर ५ व उपविभागस्तरावर २२ अशा एकूण २८ प्रयोगशाळांद्वारा पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

जिल्हानिहाय दूषित नमुन्यांची संख्या
च् रासायनिक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात ७१२८ पैकी ४१७०, अकोला ४,०१६ पैकी २,०६१, यवतमाळ १५,१२८ पैकी ५,१२३, वाशिम १,५२८ पैकी ४५३ तर बुलडाणा जिल्ह्यात ३,८५४ पैकी २००९ नमुने पिण्यास अयोग्य आहेत. जैविक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात २,९७४ पैकी ३१८, अकोला ५,१४९ पैकी १,१९१, यवतमाळ १६,७८० पैकी ३,७७६, वाशिम १,४६९ पटकी २५०, तर बुलडाणा जिल्ह्यात ४,३३७ पैकी ६६० नमुने पिण्यास अयोग्य आढळते आहेत.

भूपृष्ठावरील पाणी, भूजल प्रदूषणांची कारणे
च्प्रक्रिया न केलेले किंवा प्रक्रिया पूर्ण न झालेल्या औद्योगिक सांडपाण्याचा नदी-नाल्यात होणारा विसर्ग, शेती व्यवसायात वापरली जाणारे रासायनिक खते, आम्ल वर्षा, जमिनीत टाकण्यात येणारे टाकाऊ पदार्थ व भूगर्भात आढळून येणारी खनिजे पाण्यात विरघळल्याने भुपृष्ठावरील पाणी व भूजल प्रदूषित होत असल्याचे वास्तव आहे.

Web Title: 21 thousand water samples of Varhad are contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी