२.१५ लाख ग्राहक लिंकिंगविनाच
By admin | Published: January 20, 2015 10:29 PM2015-01-20T22:29:14+5:302015-01-20T22:29:14+5:30
जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ७७ ग्राहकांनी बँकेत कागदपत्रे जमा केली असून हे ग्राहक अनुदानासाठी पात्र झाले आहेत. मात्र उर्वरित २ लाख १५ हजार ९५ ग्राहकांनी अजून लिंकींग केले
अमरावती : जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ७७ ग्राहकांनी बँकेत कागदपत्रे जमा केली असून हे ग्राहक अनुदानासाठी पात्र झाले आहेत. मात्र उर्वरित २ लाख १५ हजार ९५ ग्राहकांनी अजून लिंकींग केले नसल्याने त्यांना अनुदान मिळणार नाही. दरम्यान अनुदानासाठी गॅस वितरकांकडे बँक खाते क्रमांक जमा न केल्यास संबंधित ग्राहकांचा गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा फतवा काढण्यात आला आहे.
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅसचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. अनुदानासाठी ग्राहकांनी बँकेत अर्ज व आधार कार्डचा नंबर द्यायचा असते. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी बँक खाते क्रमांक दिला तरी अनुदान मिळते. त्यासाठी पासबुकची झेरॉक्स जमा करावी लागते. त्यानंतर अनुदान जमा होते. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडेन कंपनीकडून गॅसचा पुरवठा केला जातो यासाठी शहरासह जिल्ह्यात गॅस एजन्सी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ३ लाख २९ हजार ३४२ ग्राहकांचे लिकींग झाले असून ५६८ रूपयांप्रमाणे त्यांचे अनुदान बँक खात्यात जमा झालेले आहे. उर्वरित २ लाख १५ हजार ७७ ग्राहकांनी अजून वितरकांकडे बँक खाते क्रमांक जमा केलेला नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळणार नाही १ जानेवारीपासून ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरूवात झाली आहे. २० जानेवारीपर्यंत २ लाख २९ हजार ३४२ ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. ३१ मार्चपर्यंत लिंकिंग करणे आवश्यक आहे. तीन महिने असल्यामुळे ग्राहक लिंकिंगचे काम पुढे ढकलत आहेत. मात्र शेवटच्या महिन्यात एकाच वेळी ग्राहकांनी लिंकिंगसाठी एजन्सीकडे अर्ज केल्यास त्यांचा ताण कर्मचाऱ्यांवर येईल त्यामुळे अनेकांना अनुदानापासून वंचित रहावे लागेल. अनुदान योजनेंतर्गत प्रथम गॅस बुकींगला ५६७ रूपये खात्यावर जमा होतात नंतर टाकी ७६५ रूपयांना घेतल्यानंतर २९४ रूपये ८० पैसे खात्यावर जमा होतात. ५६७ व २९४ रूपये ८० पैसे मिळून ८६२ रूपये ८० पैसे बँक खात्यात जमा होतात. ग्राहकांना सिलिंडर केवळ ७६० रूपयांना मिळते. पहिली सिलिंडर घेताना ग्राहकांचा १०० रूपयांचा फायदा होतो. (प्रतिनिधी)