मातृ वंदनमधील ५३ हजार ७७० मातांना २२ कोटींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:34 AM2021-02-20T04:34:50+5:302021-02-20T04:34:50+5:30
अमरावती : गर्भवती महिला, स्तनदा मातांना सकस आहार उपलब्ध होऊन त्यांचे व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री मातृ ...
अमरावती : गर्भवती महिला, स्तनदा मातांना सकस आहार उपलब्ध होऊन त्यांचे व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबिवण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ५३ हजार ७७० गरोदर महिलांना लाभ देण्यात आला. त्यांच्या बँक खात्यात २२ कोटी ६१ लाख रुपये अनुदान जमा केले आहे. या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार २७७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २२ कोटी ५१ लाख ७ हजार एवढे अनुदान जमा केले आहे. यापैकी महापालिका क्षेत्रातील १२ हजार ४५५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ५ कोटी २७ लाख ६४ हजार रुपये जमा केले आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणेने गती घेत ९६ टक्के लक्ष्यांकपूर्ती केली आहे.
गर्भधारण केलेल्या मातेच्या जीवनातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, स्वत:बरोबर तिच्या उदरातील बाळाचे पालनपोषण करणे ही एक मोठी जबाबदारी असते. मजुरीचे काम करणाऱ्या अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतरही उदरनिर्वाहासाठी काम करावे लागते. अशा गर्भवती महिला व मातांचे कुपोषित राहिल्याने त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.गरोदर माता व जन्माला येणाऱ्या बालकांचे आरोग्य सुधारणा, मातांना सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहन तसेच मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने राज्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१७ पासून लागू केली आहे. या योजनेची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर,मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी केले आहे.
बॉक्स
अशा मिळतो लाभ
या योजने अंतर्गत फक्त प्रथमवेळी गरोदर राहणाऱ्या मातांना योजनेचा लाभ दिला जातो. गरोदर माता आणि स्तनपान करणाऱ्या मातांना पहिल्या जीवंत मुलाच्या जन्माच्यावेळी लाभ दिला जातो. तीच्या स्वतंत्र बँक खात्यात ५ हजार रुपये सहाय्यता रक्कम जमा केली जाते.१ हजार रुपयाचा पहिला टप्पा गरोदर असतेवेळी अंगणवाडीला नोंदणी होतांना दिला जातो. २ हजार रुपयांचा दुसरा टप्पा सहा महिन्यात तपासणी केल्यावर तर २ हजार रुपयाचा तीसरा लाभ बाळाचा जन्म होऊन नोंदणी केल्यावर जन्मत: पोलीओ, बिसीजी, पोलीओचे तीन डोज, पेन्टाव्हॅलन्ट लसीचे तीन डोज पूर्ण केल्यावर लाभार्थ्यांच्याअनुदान दिले जाते.