२२ कुष्ठरुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:53+5:302021-06-10T04:09:53+5:30
अमरावती : अवघ्या जगाला हैराण करणाऱ्या कोरोनाने कुष्ठरुग्णांनादेखील सोडले नव्हते. मात्र, तपोवनस्थित विदर्भ महारोगी सेवा मंडळातील २२ जणांनी त्यावर ...
अमरावती : अवघ्या जगाला हैराण करणाऱ्या कोरोनाने कुष्ठरुग्णांनादेखील सोडले नव्हते. मात्र, तपोवनस्थित विदर्भ महारोगी सेवा मंडळातील २२ जणांनी त्यावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
तपोवन स्थित १४० एकरात विदर्भ महारोगी सेवा मंडळाची स्थापना पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन ऊर्फ दाजीसाहेब यांनी १ जुलै १९५० रोजी केली. दरम्यानच्या काळात कुष्ठरुग्णांना समाजात हीन दर्जा दिला जात होता. त्यांना आधार देत योग्य औषधोपचाराने बरे करून स्वतंत्र राहण्याची सोय दाजीसाहेबांनी केली. तेथे सुरुवातीला १६०० रुग्ण वास्तव्याला होते. सद्यस्थितीत ४०० व्यक्ती कुष्ठरोगामुक्त झालेले तेथे राहतात. त्यांची सर्व व्यवस्था पालक म्हणून मंडळाचे सचिव वसंत बुटके सांभाळतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र दवाखाना स्थापन करण्यात आला असून, एक डॉक्टर त्यांच्या सेवेत आहेत. कोरोना काळात त्यातील काहींना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने तपासणीच्या उद्देशाने शिबिर घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार तेथे २९ एप्रिलपासून तीन दिवसीय तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये २२ रुग्ण आढळून आले. त्यांना तेथीलच दवाखान्यात उपचार देण्यात आले. यासाठी दोन वार्ड करून स्त्री व पुरुषांची व्यवस्था करण्यात आली. १० दिवस त्यांना सकस आहार, ए, बी, सी व्हिटॅमीनच्या गोळ्या, औषधी नियमित देऊन तंदुरुस्त करण्यात आले. कुणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही. १४ दिवसांनी सर्व रुग्ण बरे झाल्याची खात्री केल्यानंतर त्यांना आपापल्या स्थानावर पाठविण्यात आले.
बॉक्स
संस्थेत एप्रिल महिन्यात काही व्यक्तींना कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यांना इतरांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला दिला. कुष्ठरुग्णांना कोविड सेंटरवर तपासणीकरिता नेण्याऐवजी येथेच शिबिर घेण्याबाबत महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्याशी पत्रव्यवहार बुटके यांनी केला. त्यांनी विनंतीला मान देऊन शिबिर घेण्यास संमती दर्शविली. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वीच त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने येथील कोरोना आटोक्यात आणण्यास मदत झाली.
कोट
विदर्भ महारोगी सेवा मंडळात सद्यस्थितीत ४०० कुष्ठरोगातून मुक्त झालेले व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यांचे पालकत्व माझ्याकडे आहे. कोरोनाचा धोका वाढू नये, म्हणून तातडीने शिबिराच्या माध्यमातून तपासणी करून योग्य औषधोपचाराची मात्रा देऊन सकस आहारावर भर दिला. त्यामुळे २२ जणांना कोरोनातून बरे करण्यात यश आले.
- वसंत बुटके,
सचिव, विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन