२२ अधिका-यांच्या बेकायदा संपत्तीवर टाच! एसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 05:30 PM2017-12-26T17:30:09+5:302017-12-26T17:32:37+5:30
ज्ञात स्रोतापेक्षा जादा संपत्ती गोळा करणा-या राज्यातील २२ अधिकारी-कर्मचा-यांवर एसीबीने लगाम कसला आहे. महसूलसह अन्य १६ विभागांतील या २२ अधिकारी-कर्मचा-यांची ३५.५६ कोटींची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
- प्रदीप भाकरे
अमरावती : ज्ञात स्रोतापेक्षा जादा संपत्ती गोळा करणा-या राज्यातील २२ अधिकारी-कर्मचा-यांवर एसीबीने लगाम कसला आहे. महसूलसह अन्य १६ विभागांतील या २२ अधिकारी-कर्मचा-यांची ३५.५६ कोटींची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
१ जानेवारी ते १८ डिसेंबर २०१७ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा बाळगल्याप्रकरणी २२ प्रकरणी गुन्हे दाखल केलेत. यात एकूण ४४ व्यक्तींचा सहभाग आहे. वर्ग १ चे ५, तर वर्ग २ व वर्ग ३ चे प्रत्येकी ८ तसेच एका अन्य लोकसेवकावर अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे. यात २२ खासगी व्यक्तींवरही गुन्हे दाखल झाले आहेत. या खासगी व्यक्तीत संबंधित अधिकारी-कर्मचा-यांच्या कौटुंबिक सदस्य आहेत.
वर्ग १ च्या पाच अधिकाºयांनी १७ कोटींची अपसंपदा बाळगली, तर वर्ग २ व वर्ग ३ च्या अधिकारी-कर्मचाºयांवर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ती मालमत्तासुद्धा एकूण १७ कोटींहून अधिक आहे. इतर लोकसेवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातील मालमत्ता ३२.३४ लाख आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये अपसंपदांची २२ प्रकरणे उजेडात आणली. यात महापालिकेचे पाच, महसूल व सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रत्येकी तीन, प्रादेशिक परिवहन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रत्येकी दोन, तर पाटबंधारे, पंचायत समिती, उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग, सहकार व पणन, कृषी, अन्न व औषधीसह वनविभागातील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे.
अन्य भ्रष्टाचाराची २८ प्रकरणे
लाच स्विकारताना यशस्वी केलेला सापळा, अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. याशिवाय एसीबीने यंदा अन्य प्रकारच्या २८ घटनांमध्ये भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केलेत. यात वर्ग १ चे ४९, वर्ग २ चे १५, वर्ग ३ चे २७, वर्ग ४ चे २, इतर लोकसेवक १२ व ८९ खासगी व्यक्तींसह १९४ व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.