राज्यात दोन वर्षांत २२ वाघ मारले; माजी वनमंत्र्यांच्या पत्राने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 01:37 PM2022-07-08T13:37:36+5:302022-07-08T13:42:37+5:30
गत दाेन वर्षांत २२ वाघ मारले गेल्याच्या घटना या व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पत्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती : देशात बहुतांश वाघ महाराष्ट्रात असून त्यातही विदर्भात सर्वाधिक वाघ आहेत. मात्र, गत दाेन वर्षांत २२ वाघ मारले गेल्याच्या घटना या व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पत्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाने खबऱ्यांवरही सूक्ष्म नजर ठेवावी, असा सल्ला देखील मुनगंटीवार यांनी वन खात्याला दिला आहे.
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सन जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत वाघ, बिबट्यांच्या शिकारीचा दाखला देत सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत विशेष समिती नेमावी, असे पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले होते. तथापि, या पत्राच्या अनुषंगाने वन खात्याने वाघांची शिकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, हे वास्तव आहे.
ब्रम्हपुरी वनविभागात वन विभागाने ताब्यात घेतलेला आराेपीच खबऱ्या बनून वन्यजीव शिकारीची माहिती देऊन बक्षीस घेत असल्याची बाब समोर आली होती. अटकेतील आरोपीचा गत दोन वर्षांत चंद्रपूर जिल्हा अथवा विदर्भात वाघांच्या शिकार प्रकरणी हस्तक्षेप असावा, असा अंदाज मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे गत दोन वर्षांत २२ वाघ मारले गेले, याप्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत विशेष चौकशी नेमावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १५ ऐवजी २० लाखांची मदत मिळावी, यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देण्यात येणार आहे. आर्थिक मदत मिळण्यासाठी वन विभागाने निगेटिव्ह प्रणाली सुरू करावी, असा प्रयत्न असेल. विशेषत: व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी खबऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवावी.
- सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री तथा आमदार.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे मृत्यू
- कापसी (ता. सावली), २८ जानेवारी २०२०
- मुडझा (ता. ब्रम्हपुरी), ११ जानेवारी २०२०
- पिंपळखुट (ता.चंद्रपूर), १८ जून २०२०
- मुधोली (ता. भद्रावती), २४ जुलै २०२०
- रत्नापूर (ता.सिंदेवाही ) ४ नोव्हेंबर २०२०
- चक बोर्डा (ता.चंद्रपूर), २५ एप्रिल २०२१
- धानोरा (ता. सिंदेवाही), ८ जून २०२१
- पाचगाव (ता. गाेंडपिंपरी) , २१ ऑगस्ट २०२१
- भटारी (ता. पोंभुर्णा), १० सप्टेबर २०२१
- चिंचबोडी (ता. सावली), ८ ऑक्टोबर २०२१
- खरकाडा- वाढोणा (ता. नागभीड), २२ नोव्हेंबर २०२१
- नलफाडी (ता. राजुरा), १० जानेवारी २०२१
- तोरगाव (ता. ब्रह्मपुरी), ९ फेब्रुवारी २०२२