२२ हजार कुटुंबांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:00 PM2017-10-16T22:00:39+5:302017-10-16T22:01:15+5:30
बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील २२ हजार शेतकºयांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्वभागात केवळ एकरी एक पोते सोयाबीन घरी आल्याने गतवर्षीचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले कर्ज परत करण्याची व्यवस्था शेतकºयांकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़
जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ यंदा केवळ १० टक्के पाऊस झाल्याने सोयाबीन व कापूस दिवाळीला घरी आलेच नाही. शेतकरी दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा सोयाबीन काढणे अवघड झाले़ हॉर्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एकरी १ पोत सोयाबीन निघाले. त्यामुळे हॉर्वेस्टरचा खर्च देणे परवडले असल्याची माहिती दिघी येथील शेतकरी समीर महल्ले यांनी दिली़ एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च सोयाबीन लागवडीसाठी आला. मात्र दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी की दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
पाच टक्केच शेतात झाली कापसाची सीतादही
अल्प पाऊस, त्यात ढगाळ वातावरण व कमी उन्हाने या कपाशीच्या झाडाला सूर्यकिरण पोषकरीत्या मिळाले नाही़ त्यामुळे कपाशीचे झाड कमजोर झाले़ त्यातही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षी दसºयाला होणारी कापसाची सीतादही दिवाळीनंतरही झालेली नाही़ तालुक्यात केवळ पाच टक्के शेतकºयांनी सीतादही केली आहे़ गतवर्षी २ ते ३ क्विंटल कापूस ३० टक्के शेतकºयांच्या घरी आल्याने दिवाळी सणाच्या पूर्वी आला होता़
चना, गहू बियाण्यांची शेतकºयांना अपेक्षा
पाऊस नसल्याने खरीप हंगाम हातातून गेला. आता रब्बीकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटा वेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये,पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येतो. गहू पिकासाठी यापेक्षा अधिक खर्च येतो. खरीप गेल्यामुळे गहू व चना बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांची आहे़
जुन्याच कपड्यावर साजरी करणार दिवाळी
घरी दोन एकर शेती, केवळ तीन पोते सायोबीन घरी आले़ अपेक्षित पीक झाले नाही़ यंदा निसर्गाच्या चक्रव्युहामुळे हातात पीक आले नाही. घरी फराळाचे तर सोडाच साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याचीही सोय नाही. दिवा कसा पेटवायचा ही चिंता सतावत आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले़
मागील २० वर्षांत असे दुष्काळाचे वर्ष पाहिले नाहीत. सरकारने दिवाळीपूर्वी १० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते़ ते आश्वासन हवेतच विरले.त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात जाणार आहे़
- नितीन दगडकर, शेतकरी