मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील पारंपरिक गोटमार यात्रेत २२६ जखमी
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: September 10, 2018 08:31 PM2018-09-10T20:31:52+5:302018-09-10T20:32:52+5:30
श्रद्धेचे प्रतीक : ७१ वर्षांत १२ जणांचा मृत्यू, हजारोंना अपंगत्व, अनेकांचे संसार उघड्यावर, प्रशासन हतबल
संजय खासबागे
वरुड (अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावरावरील मध्यप्रदेशातील जांब नदीपात्रात पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीपात्रात पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत परंपरेनुसार गोटमार यात्रा भरली. यामध्ये एकमेकांवर केलेल्या गोटमारीत २२६ जण जखमी झालेत.
मध्यप्रदेश प्रशासनाने गोटमार यात्रा बंद करण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. यावर्षीसुध्दा पोळयाच्या करीला विधिवत पळसाचे झाड लावून पूजाअर्चा झाल्यांनतर गोटमार यात्रा सुरू झाली. यात जे ४०० जण जखमी झालेत ते श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. या प्रकारात ७१ वर्षांत यामध्ये १२ लोकांचे प्राण गेले, तर हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे. परंतु ही कूप्रथा सुरूच असल्याने नागरिक याला कंटाळले असले तरी पोळ्याच्या करीला हा प्रघात नित्याने सुरुच असतो. येथे मोठी यात्रा भरत असून, विदर्भासह मध्यप्रदेशातील भाविकांची मोठी गर्दी असते.
देशात ही गोटमार यात्रा एकमेव असून, केवळ अधंश्रद्धेपाटी निर्माण झालेली श्रद्धा जागृत होऊन हा अघोरी प्रकार येथे दरवर्षी केला जातो. ही प्रथा ३०० वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. सावरगाव येथील युवतीसोबत पांढुर्णा येथील युवकाचे प्रेमसूत जुळले होते. ते विवाहबंधनात अडणार तेवढ्यात मान-प्रतिष्ठेच्या अडथळा निर्माण झाल्याने युवतीला सावरगावातून पांढुर्णा येथे नेत असताना दोन्ही गावातील लोकांनी त्यांना जांब नदीपात्रात हेरून दोन्हीकडून दगडांचा वर्षाव प्रेमियुगुलांवर करण्यात आला. त्यात दोघे दगावले, त्यांना चंडिका मातेच्या मंदिरात पूजाअर्चा करून सहमतीने समाधी देण्यात आली. ही घटना पोळ्याची करीला घडल्याने या दिवशी या दोन्ही गावांतील लोकं या नदीत गोटमार यात्रा भरवित असल्याची आख्यायिका आहे. या दोन्ही आख्यायिका आजही येथील नागरिक श्रद्धेने जोपासतात. यावर्षी गोटमार यात्रेत २२६ भाविक जखमी झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये शंकर भलावी (२५, रा. भुयारी जि. छिंदवाडा) यांचा मृत्यू झाला, तर जखमींमध्ये बाबुराव कळम्बे (५०), मनोज रेवतकर (४०, दोन्ही रा.पांढुर्णा) गंभीर जखमी झाल्याने नागपूरला हलविण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत २२६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.