२३ इमारती अतिधोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 09:57 PM2018-06-05T21:57:23+5:302018-06-05T21:58:08+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, त्यात एकूण ८० इमारतींचा समावेश आहे. गतवर्षी ही संख्या १०० झाली होती. यंदा २३ इमारती अति धोकादायक आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीचा वापर थांबवून त्या रिकाम्या कराव्यात आणि धोकादायक बांधकाम पाडावे, अशा आशयाची नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, त्यात एकूण ८० इमारतींचा समावेश आहे. गतवर्षी ही संख्या १०० झाली होती. यंदा २३ इमारती अति धोकादायक आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीचा वापर थांबवून त्या रिकाम्या कराव्यात आणि धोकादायक बांधकाम पाडावे, अशा आशयाची नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली आहे.
शासन परिपत्रकाप्रमाणे शिकस्त इमारतींचे चार प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार ‘सी वन’ या प्रकारात मोडणाऱ्या अति धोकादायक इमारतींचा आकडा २३ आहे. यात सर्वाधिक १६ अति धोकादायक इमारती राजापेठ झोनमध्ये आहेत. इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती या सी २ ए या प्रकारात एकूण १४ इमारती, तर इमारत रिकामी न करता दुरुस्ती प्रवर्गात मोडणाºया सी २ बी या प्रकारातील एकूण २९ इमारती शहरात आहेत. १४ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्याची नोटीस सी ३ या प्रवर्गात मोडणाºया इमारतींना पाठविण्यात आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पाचही प्रशासकीय झोनप्रमुखांनी शिकस्त इमारतींची यादी बनवून संबंधितांना नोटीस पाठविल्या आहेत. राज्यात दरवर्षी पावसाळ्यात जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे या इमारतीबाबत काय कारवाई करावी, याबाबत नगरविकास विभागाने शासननिर्णय काढून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अति धोकादायक इमारती संबंधित मालकांनी स्वत:हून पाडाव्यात, अशी नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यापैकी न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता, अन्य इमारतींचा पाणी व विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत मजीप्रा व महावितरणला पत्र देण्यात आल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता जीवन सदार यांनी दिली.
असे आहेत आदेश
‘सी वन’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या रहिवासी प्रकारातील इमारतींना महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३५४ अन्वये नोटीस बजावून इमारत निष्कासित करावी. इमारत रिकामी करण्यापूर्वी त्यामधील भाडेकरू, सदनिकाधारक यांच्या ताब्यात असलेले चटई क्षेत्रफळ मोजून त्याप्रमाणे प्रत्येक भाडेकरू, सदनिकाधारक व मालक, सहकारी संस्थास तसे प्रमाणपत्र देण्यात यावे.
असे आहे वर्गीकरण
सी वन - अति धोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या.
सी २ ए - इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या.
सी २ बी - इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गात मोडणाऱ्या.
सी ३ - इमारती किरकोळ दुरुस्ती प्रवर्गात मोडणाऱ्या.