पहिल्याच महिन्यात २३ शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 10:52 PM2018-02-06T22:52:37+5:302018-02-06T22:53:03+5:30
अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोप यामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोप यामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे दुर्दैवी चित्र कायम आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यात २३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. गेल्या दीड दशकात यंदाच्या जानेवारीत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.
दुष्काळ, नापिकी यामूळे वाढलेले सावकारी व बँकांचे कर्ज यांसह अन्य कारणांमुळे शेतकºयांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुलामुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शी अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१८ पावेतो ३ हजार ३४५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये १ हजार ३७० प्रकरणे पात्र, १ हजार ९२७ अपात्र, तर ४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. गतवर्षी जिल्ह्यात २७१ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी २४, मार्च ३०, एप्रिल १४, मे १७, जून २१, जुलै २५, आॅगस्ट २७, सप्टेंबर ३२, आॅक्टोबर २३, नोव्हेंबर १३ व डिसेंबरमध्ये २४ शेतकरी आत्महत्या झाल्या.
२००१ पासून ३,३४५ शेतकरी आत्महत्या
जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यत ३ हजार ३४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्दैवी आहे २००१ मध्ये ११ प्रकरणे होती. २०१६ मध्ये ३४९, तर २०१७ मध्ये २७१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.