२३ स्वास्थ्य निरीक्षकांना ‘शो-कॉज’
By admin | Published: February 4, 2017 12:09 AM2017-02-04T00:09:17+5:302017-02-04T00:11:03+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीची गती मंदावल्याने स्वास्थ्य निरीक्षक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
'डेडलाईन' डोक्यावर : वैयक्तिक शौचालय अपूर्णच
अमरावती : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीची गती मंदावल्याने स्वास्थ्य निरीक्षक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम ही त्रयी हा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी आग्रही असताना अधिनस्थ यंत्रणा कामचुकारपणा करीत असल्याचे या नोटीसच्या निमित्ताने उघड झाले आहे.
महापालिकेच्या पाचही प्रशासकीय झोनमधील २३ स्वास्थ्य निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वैयक्तिक शौचालयाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच असमाधानकारक असल्याने संबंधित स्वास्थ्य निरिक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक यांचा उलटटपाली खुलासा मागवावा, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना केली आहे. मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष यंत्रणेने ठेवले आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत (नागरी) शहरातील पाचही प्रभागात वैयक्तिक शौचालयांची उभारणी सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात फिल्डवर काम करणारे स्वास्थ्य निरीक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक या उभारणीकडे लक्ष देत नसल्याचे निरीक्षण शेटे यांनी नोंदविले आहे. विशेष म्हणजे क्यूसीआय पथकाने १७ ते १९ जानेवारीदरम्यान केलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणावेळी वैयक्तिक शौचालयाची संपूर्ण कामे २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होतील, अशी ग्वाही यंत्रणेकडून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही पाच झोनमधून ३५६१ शौचालयाची बांधकाम पूर्ण झालेली नाहीत. यात झोन १ मधील ७३८, झोन २ मधील ४९३, झोन ४ मधील ६४४, झोन ४ मधील ६८० व झोन पाच मधील सर्वाधिक १००६ अपूर्ण शौचालयांचा समावेश आहे. वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वास गेल्यावर शहर हागणदारीमुक्त घोषित केले जाणार आहे. मात्र वैयक्तिक शौचालयाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने ३१ मार्चपर्यंत लक्ष्यपूर्ती होईल का? याबाबत यंत्रणेमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने पाचही प्रशासकीय झोनमधील २३ स्वास्थ्य निरिक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांकडून खुलासा मागण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)