पहिल्यांदा धूरकरी झालेली २३ वर्षांची उन्नती म्हणते, ‘डर के आगे जित है’!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 12:44 PM2023-01-21T12:44:55+5:302023-01-21T12:58:14+5:30
उन्नतीच्या पाठीवर कौतुकाची थाप
मनीष तसरे
अमरावती : २३ वर्षांची पोर ती. गावातच शंकरपट पाहत मोठी झालेली; पण हातात कधी बैलाचे कासेही धरले नव्हते. पण, गावाच्या इभ्रतीसाठी, वडिलांच्या शब्दाखातर तिने महिलांच्या शंकरपटात नाव दिले. पहिल्यांदा ती धूरकरी झाली आणि तब्बल आठ वर्षांनंतरचा पहिला पट आपल्या नावे केला. कारण तिला माहीत होते, डर के आगे जित है. १२५ वर्षांची परंपरा लाभलेल्या तळेगाव दशासर येथील कृषक सुधार समितीच्या वतीने आयोजित शंकरपटाच्या चौथ्या दिवशीचा तो थरार हजारो गावकऱ्यांनी नुसता बघितलाच नाही तर उन्नतीच्या पाठीवर कौतुकाची थापदेखील दिली.
होय, उन्नती लोया या धाडसी तरुणीचे नाव आहे. तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक शंकरपटाने तिला नाव मिळवून दिले. या गावात काेरोनापश्चात ऐतिहासिक शंकरपटाचे वेध लागले. पण, आठ वर्षांच्या कालवधीने होत असलेल्या या शंकरपटात महिला धूरकरी येतील किंवा नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे आयोजकांपैकी एक असलेल्या वडिलांनी मुलगी उन्नतीलाच सहभाग घेण्यास सांगितले. घरी शेतीची पार्श्वभूमी असली तरी तिने आतापर्यंत बैलांचे कासरेही धरले नव्हते.
उन्नतीने वडिलांना होकार दिला, मात्र तिच्या मनात धाकधूक होती. बैलांनी आपल्याला पाडले तर.. बैल वेगळीकडेच धावले तर... मात्र वडिलांनी सांगितले, तू करू शकतेस. संग्राम-देवगिरी ही बैलजोडी पटासाठी देणाऱ्या जोडीमालकानेही धीर दिला. लागलीच ती धूरकरी व्हायला तयार झाली. तिनेही मनाशी प्रण केला, मी करू शकते. ‘डर के आगे जित है’ ही खूणगाठ तिने मनाशी बांधली आणि बघता बघता धूरकरी झाली.
बहिरम यात्रेत आजपासून शंकरपट; चेंडू-सैराट दाखल, हार्दिक कृणाल पांड्या येणार
या शंकरपटात उन्नतीसह १५ महिला धूरकरी सहभागी झाल्या. यात ४५० फुटांचे अंतर उन्नती हाकत असलेल्या बैलजोडीने १३.७२ सेकंदात पार करून प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, वडिलांच्या आग्रहाखातर सहभागी झालेली उन्नती ही उच्चविद्याविभूषित असून, नागपूरला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करीत आहे. तिच्याबाबत माहिती असणाऱ्या ग्रामस्थांनी बक्षीस वितरणाला टाळ्यांचा जो प्रचंड कडकडाट केला, तो तिच्या या धाडसाला होता. जिंकलेले बक्षीस हे तिने बैलजोडी मालकाला दिले.
मिळालेल्या संधीचे सोने
पहिल्यांदाच शंकरपटात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या संधीचे मी सोने केले, त्यामुळे आता शंकरपटाबाबतची आवड आपसुकच निर्माण झाली आहे. युपीएससीची तयारी करीत असताना दरवर्षी पटात सहभागी होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उन्नतीने सांगितले.