कर्जमाफीच्या वर्षपूर्तीत २३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 07:53 PM2018-06-27T19:53:32+5:302018-06-27T19:58:58+5:30
आर्थिक अडचणीतील शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, वर्षपूर्तीच्या कालावधीत अटी-शर्र्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही.
- गजानन मोहोड
अमरावती - आर्थिक अडचणीतील शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, वर्षपूर्तीच्या कालावधीत अटी-शर्र्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. या वर्षभरात २३० शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. जिल्ह्यात दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुलामुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; मात्र या वर्षभराच्या कालावधीत दर तीस तासांत शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.
शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात २७ जून २०१८ पर्यंत ३ हजार ४३२ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ४२८ प्रकरणे पात्र, १ हजार ९४० अपात्र, तर ६४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. गेल्या १७ वर्षांचा आढावा घेता, सर्वाधिक ३२३ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यात २६७, फेब्रुवारी २९०, मार्च ३०४, एप्रिल २४८, मे ३००, जून २६७, जुलै २६४, सप्टेंबर ३२४, आॅक्टोबर ३१५, नोव्हेंबर २८५ व डिसेंबर महिन्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासन नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्दैवी आहे.
कर्जमाफीच्या काळातील शेतकरी आत्महत्या
शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा २२ जून २०१७ ला केली व प्रत्यक्षात पहिला शासनादेश २८ जून २०१८ ला जाहीर झाला. या वर्षभरात २३० शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये जून २०१७ मध्ये २१, जुलै २५, आॅगस्ट २९, सप्टेंबर ३२, आॅक्टोबर ३२, नोव्हेंबर १३, डिसेंबर २५, जानेवारी २०१८ मध्ये २३, फेब्रुवारी २०, मार्च २६, एप्रिल १३, मे १४ व २७ जूनपर्यत १० शेतकºयांनी मृत्यूचा फास आवळला आहे.
बळीराजा चेतना अभियान केव्हा?
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्र्थिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असताना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.
शेतकरी स्वावलंबी मिशन कुचकामी
राज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाºया १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगस्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. शासनाने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला; मात्र शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.