मेळघाटातील ५४ पाड्यांमध्ये शेताच्या बांधावर २३ हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:58+5:302021-07-11T04:10:58+5:30

फोटो - १०एएमपीएच०५ - मेळघाटातील दाभिया शिवारात साजरा करण्यात आलेल्या वनमहोत्सवात सहभागी अधिकारी व आदिवासी ग्रामस्थ. -------------------------------------------------------------------------------------- राज्यासाठी प्रेरणादायी ...

23,000 trees on farm bunds in 54 padas in Melghat | मेळघाटातील ५४ पाड्यांमध्ये शेताच्या बांधावर २३ हजार झाडे

मेळघाटातील ५४ पाड्यांमध्ये शेताच्या बांधावर २३ हजार झाडे

Next

फोटो - १०एएमपीएच०५ - मेळघाटातील दाभिया शिवारात साजरा करण्यात आलेल्या वनमहोत्सवात सहभागी अधिकारी व आदिवासी ग्रामस्थ. --------------------------------------------------------------------------------------

राज्यासाठी प्रेरणादायी मेळघाटचा हटके वनमहोत्सव : शेतकऱ्यांना अनेक फायदे, जंगलाची वृक्षतोड थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या जंगलातील हजारो वृक्षांची दरवर्षी कत्तल होते. त्यावर उपाय म्हणून आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध प्रकारचे उत्पन्न व जलतन देणारे वृक्ष लावण्याची मोहीम १ते ७ जुलै दरम्यान मेळघाटातील ५४ पाड्यांमध्ये राबवून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येकी दहा याप्रमाणे २ हजार ३०० शेतकऱ्यांसाठी २३ हजार झाडे यात लागणार आहेत. त्यामुळे मेळघाटातील वृक्षतोडीला आळा बसण्यासह शेतकऱ्यांना अनेक फायदे यातून होणार आहे. मेळघाटचा उपक्रम राज्यातील इतरही वन्यक्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

राज्यभर दरवर्षी वन महोत्सव १ ते ७ जुलै दरम्यान साजरा होतो. परंतु, मेळघाटात यावर्षी महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. वनजमिनीसोबतच शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले आणि शेताच्या बांधावरचा वन महोत्सव उत्साहाने साजरा झाला. पानी फाउंडेशनचे अविनाश पोळ, मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, सिपनाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, अकोटचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, गुगामलचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांच्यासह एसीएफ, बीडीओ, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक निसर्ग फाऊंडेशन कार्यकारी संचालक धनंजय सायरे, स्वप्निल सोळंके, गीता बेलपत्रे, क्षेत्र समन्वयक पंढरी हेकडे, नागोराव सोलकर, सुरेश सावलकर आदींचा सहभाग महत्त्वपूर्ण होता.

बॉक्स

शेतीच्या बांधावरची झाडे अतिउपयुक्त

उपयोगाची झाडे बांधावरच उपलब्ध झाली, तर शेतीला अनेक पर्यावरणीय फायदे होतील, असे याप्रसंगी शेतकऱ्यांना पटवून सांगण्यात आले. धारणी तालुक्यातील मान्सुधावडी येथील मौजीलाल भिलावेकर यांचे शेती करण्याच्या अभिनव पद्धतीचे प्रशिक्षणही देण्यात आले. बांधावर झाडे लावल्याने मृदा व जल संवर्धन होईल. जैवविविधता वाढेल. वादळ, अतिवृष्टी, पूर, नुकसानकारक किडींचा हल्ला यापासून पिकांचे नुकसान थांबेल. शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल. उत्पादन वाढेल. लाकूड शेतातूनच मिळाल्याने जंगलात जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि महत्वपूर्ण मानव वन्यजीव संघर्ष कमी होणार आहे.

बॉक्स

११३ पैकी ५४ गावांतून २२३१ शेतकरी पुढे आले

वन महोत्सव हा अंगार मुक्त जंगल स्पर्धेच्या उपक्रमातील एक भाग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट व मेळघाट या चार वन्यजीव विभागांतून ११३ गावे यात सहभागी झाली होती. त्यापैकी ५४ गावांनी वन महोत्सवात सक्रिय सहभाग घेतला. २२३१ शेतकरी व प्रति शेतकरी दहारोपे या प्रमाणे २२३१० रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. ही झाडे शेतीच्या बांधावर लावण्यात येणार आहेत.

कोट

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये यंदा वेगळ्या पद्धतीने वन महोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये बांधावर झाडे लावून आदिवासी शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे जंगलतोड वाचण्यासाठी अनेक फायदे त्यांना होणार आहे. राज्यातील इतर भागासाठी हा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.

- धनंजय सायरे, कार्यकारी संचालक निसर्ग फाउंडेशन, मेळघाट

Web Title: 23,000 trees on farm bunds in 54 padas in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.